कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:08 IST2025-05-01T15:07:52+5:302025-05-01T15:08:27+5:30
चोराला त्याच्या चोरीबद्दल शिक्षा ठोठावायची की चोरीच्या पैशाने तो करत असलेल्या कामाबद्दल त्याची प्रशंसा करायची हेच समजत नाही.

कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
अनेकदा आपण पाहिलं असेल की, जेव्हा एखादा चोर पकडला जातो तेव्हा असं दिसून येतं की चोरीचे पैसे वापरून तो खूप ऐशोआरामात जगला आणि त्याने अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केले. पण कधीकधी अशा घटना समोर येतात ज्या बरोबर आणि चूक यातील रेषा पुसट करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. चोराला त्याच्या चोरीबद्दल शिक्षा ठोठावायची की चोरीच्या पैशाने तो करत असलेल्या कामाबद्दल त्याची प्रशंसा करायची हेच समजत नाही.
२६० हून अधिक गुन्हे
कर्नाटकातील कलबुर्गी येथून एक अजब घटना समोर आली आहे. अशोक नगर पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे. ज्याचे नाव शिवप्रसाद आहे. असं म्हटलं जात आहे की, पकडलेला चोर हा मोठा चोर आहेच पण तो एक धार्मिक व्यक्ती देखील आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शिवप्रसादवर चोरीचे २६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. परंतु तो इतर चोरांपेक्षा वेगळा आहे कारण त्याची पैसे वापरण्याची पद्धत.
चोरीच्या पैशाचा गरजुंसाठी केला वापर
शिवप्रसादने चोरीच्या पैशाचा वापर मंदिरांमध्ये भंडारा आयोजित करण्यासाठी, रुग्णालयांमध्ये रुग्णांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी आणि धार्मिक संस्थांना लाखो रुपये दान करण्यासाठी केला. अशा चांगल्या कर्मांमुळे त्याचं पाप धुतलं जाईल असा त्याचा विश्वास होता. या संदर्भात कलबुर्गी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मोठ्या घरांना टार्गेट करायचा, नंतर त्याला मिळालेल्या पैशातून आणि दागिन्यांमधून तो गरिबांना जेवण द्यायचा आणि मंदिरांमध्ये भंडाऱ्याचं आयोजन करायचा.
कशी करायचा चोरी?
शिवप्रसादची चोरी करण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, प्रत्येक चोरीपूर्वी, तो बोटांचे ठसे राहू नयेत म्हणून त्याच्या बोटांवर फेविक्विक किंवा फेविकॉल लावत असे. या हुशारीमुळे तो वर्षानुवर्षे पकडला गेला नाही.
४१२ ग्रॅम सोनं जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, शिवप्रसादकडून ४१२ ग्रॅम सोनं आणि ३० लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याने एका मोठ्या मंदिराला ५ लाख रुपये दान केले आणि भंडाऱ्याचं आयोजन करून त्यामध्ये हजारो लोकांना जेवण दिलं होतं. चोराच्या या चांगल्या कामामुळे काही लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. चोराने लोकांचं मन जिंकलं आहे.