पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:08 IST2025-10-06T10:01:53+5:302025-10-06T10:08:29+5:30
पतीच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगत असलेल्या एका ज्येष्ठ शिक्षिकेला पुन्हा एकदा जोडीदाराची गरज वाटली आणि याच गरजेतून एका सायबर गुन्हेगाराने त्यांना ऑनलाईन प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

AI Generated Image
पतीच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगत असलेल्या एका ज्येष्ठ शिक्षिकेला पुन्हा एकदा जोडीदाराची गरज वाटली आणि याच गरजेतून एका सायबर गुन्हेगाराने त्यांना ऑनलाईन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या खोट्या रोमान्सच्या फसवणुकीत बेंगळुरुमधील ५९ वर्षीय शिक्षिकेला तब्बल २.३ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. यामुळे त्यांची आयुष्यभराची कमाई आणि सेव्हिंग्ज देखील संपुष्टात आली.
मॅट्रिमोनियल साइटवरून सुरू झाली ओळख
या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय या महिला शिक्षिकेच्या पतीचे निधन झाले होते आणि त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर वेगळा राहत होता. एकटेपणा दूर करण्यासाठी आणि पुनर्विवाह करण्यासाठी त्यांनी २०१९मध्ये एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर अकाउंट तयार केले होते.
डिसेंबर २०१९मध्ये अहान कुमार नावाच्या एका प्रोफाइलने त्यांच्याशी संपर्क साधला. कुमारने स्वतःला भारतीय वंशाचा आणि अमेरिकेतील अटलांटा येथे राहणारा व्यक्ती असल्याचे सांगितले. आपण इस्त्रायलच्या एका तेल कंपनीत ड्रिलिंग इंजिनीअर असून, सध्या ब्लॅक सी मध्ये तैनात असल्याचे त्याने सांगितले होते. विश्वास वाटावा यासाठी त्याने कंपनीचे ओळखपत्रही पाठवले, पण त्यावर त्याचा फोटो नव्हता. काही दिवसांच्या बोलण्यातूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि कुमारने शिक्षिकेशी लग्न करण्याचे वचन दिले. तो त्यांना पत्नी म्हणूनही संबोधू लागला होता.
'खायलाही पैसे नाहीत' सांगून ऐकवली खोटी कहाणी!
जानेवारी २०२०मध्ये कुमारने शिक्षिकेकडून आर्थिक मदत मागण्यास सुरुवात केली. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पैसे मिळतील, मात्र सध्या खाण्यासाठीही पैसे नाहीत, अशी खोटी कहाणी त्याने सांगितली. विश्वासात आलेली शिक्षिका त्याच्या मदतीसाठी लगेच तयार झाली.
यासाठी त्याने माधवी नावाच्या महिलेच्या खात्यात पैसे टाकण्यास सांगितले. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलवर वेगवेगळ्या समस्या सांगून त्याने वारंवार या शिक्षिकेकडून पैसे उकळले. शिक्षिकेने पोलिसांना सांगितले, "माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्याने मागितलेली प्रत्येक गोष्ट मी मान्य केली आणि माझ्याकडे होते तेवढे पैसे दिले." या महिलेने दोन वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे कुमारला एकूण २.३ कोटी रुपये दिले.
पैसे मागितल्यावर सुरू झाली दगाबाजी
संपूर्ण बचत संपल्यानंतर आणि लोकांकडून कर्ज घेतल्यानंतर, अखेरीस शिक्षिकेला संशय आला. त्यांनी कुमारकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने उलट आणखी ३.५ लाख रुपयांची मागणी केली.
यावेळी मात्र शिक्षिकेने नकार दिला आणि आपली सर्व बचत संपल्याचे सांगितले. यानंतर कुमारने त्यांच्याशी संपर्क कमी करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच, पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तपास सुरू केला आहे.