कुरार पोलिसांची कारवाई; कर्ज देण्याच्या आमिषाने गंडविणाऱ्या टोळीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 21:33 IST2019-09-11T21:32:24+5:302019-09-11T21:33:57+5:30
टोळीतील चौघांना अटक करुन रोख रक्कमेसह कागदपत्रे जप्त केली आहेत.

कुरार पोलिसांची कारवाई; कर्ज देण्याच्या आमिषाने गंडविणाऱ्या टोळीला अटक
मुंबई - गरजू नागरिकांना खासगी बॅँकेतून कर्ज मंजूर केल्याचे सांगत मासिक हप्ताच्या (ईएमआय) बदल्यात धनादेश घेवून गंडा घालणारे रॅकेट कुरार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.टोळीतील चौघांना अटक करुन रोख रक्कमेसह कागदपत्रे जप्त केली आहेत.
गुरमिठा सिंग दलवंत सिंग, गुजराल (वय ३३रा. सायन), बिरेन कौशीक पुरोहित (४४,रा. दौलतनगर ,बोरिवली),परेश शांतीलाल हिगू (२९, रा.साईबाब नगर, बोरिवली) व जीगर धीरजलाल कारलिया (३५,मिरा रोड) अशी त्यांची नांवे आहेत. कोणताही सबळ पुरावा हाताशी नसताना सोशल मीडियाचा वापर करीत पोलिसांनी त्यांना पकडले आहे. सर्वांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहेत. त्यांनी मुंबई व परिसरातील अनेकांना फसविले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.
कुरार येथील क्रांतीनगरात रहात असलेल्या सुरेशकुमार चौबे यांना २० ऑगस्टला मोबाईलवर फोन करुन कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर दुसऱ्यादिवशी एकजण त्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी आला. एचडीएफसी बॅँकेतून आलो असल्याचे सांगून कर्ज मंजूर केले आहे, त्यासंबंधी कागदपत्रे व बॅँकेचे अकाऊंट नंबर घेतला. त्याचप्रमाणे हप्तयाच्या बदल्यात चार चेक घेतले, त्यावर पेन्सिलने कॅन्सलेशनची नोंदणी करीत खात्यावर एक लाख रुपये शिल्लक ठेवण्याचे सांगून तो निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या धनादेशावर प्रत्येकी २५ हजार रक्कम घालित बॅँकेतून काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौबे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. भामट्यांनी चौबे यांना केलेले मोबाईल फोन व अन्य तपशीलही चुकीचा होता. त्यामुळे त्यांच्या घरी कर्ज मंजुरीसाठी चौकशीच्या बहाण्याने आलेल्या गुरुमिंठश सिंग या तरुणाची फेसबुकवरुन माहिती काढून शोध घेतला. त्याच्याकडून मिळालेल्या अन्य तिघांनाही अटक केली.