पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न... कॉन्स्टेबलच्या खुनाचा आरोपी तेलंगणामध्ये एन्काऊंटरमध्ये ठार, ३० गुन्हे होते दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:00 IST2025-10-20T15:54:08+5:302025-10-20T16:00:28+5:30
तेलंगणामध्ये पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा इन्काऊंटर करण्यात आला आहे.

पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न... कॉन्स्टेबलच्या खुनाचा आरोपी तेलंगणामध्ये एन्काऊंटरमध्ये ठार, ३० गुन्हे होते दाखल
Telangana Crime: तेलंगणाच्या निजामाबादमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलची चाकूने हत्या करून फरार झालेल्या आरोपींचा पोलिसांना इन्काऊंटर केला. ३० हून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार शेख रियाज हा रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेला होता. पोलिसांना त्याला शोधून काढलं आणि त्याचा इन्काऊंटर केला. रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रियाज, पोलीस कॉन्स्टेबल ई. प्रमोद यांची हत्या करून फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्या आदेशानुसार नऊ विशेष पथके कामाला लागली होती. दोन दिवसांच्या कसून शोध मोहिमेनंतर, रविवारी निजामाबादच्या सारंगापूर उपनगराबाहेरील एका मोडकळीस आलेल्या लॉरीच्या केबिनमध्ये रियाज शेख लपवला होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने एका स्थानिक व्यक्तीवर चाकूने वार करून जखमी केले.
झटापटीत गंभीर जखमी झालेल्या रियाजला उपचारासाठी निजामाबाद शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्या खोलीबाहेर एआर पोलीस कर्मचारी तैनात होते. रुग्णालयात उपचार घेत असताना रियाजने खोलीबाहेर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जर त्याने बंदुकीतून गोळीबार केला असता, तर अनेक लोकांचा जीव धोक्यात आला असता. त्यामुळे, सार्वजनिक जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि यात रियाजचा मृत्यू झाला.
३० हून अधिक गुन्हे दाखल
रियाज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वाहन चोरी, चैन स्नॅचिंगसह ३० हून अधिक गुन्हे दाखल होते. १०-११ वेळा तुरुंगात गेला होता. कॉन्स्टेबल प्रमोद यांच्या हत्येनंतर त्याच्या अटकेसाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस महासंचालकांनी शहीद कॉन्स्टेबल प्रमोद यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.