दोरीने हात बांधून बालिकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:44 IST2022-06-16T20:43:26+5:302022-06-16T20:44:50+5:30
Rape Case : जिल्हा व सत्र न्यायालय; पाच वर्षांपुर्वी देवळालीच्या सार्वजनिक शौचालयात घडली होती घटना

दोरीने हात बांधून बालिकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्तमजुरी
नाशिक : देवळाली गावातील एका सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलीचे दोरीने हात बांधून बळजबरीने शौचालयात ओढून घेऊन जात बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले रवींद्र चौहलसिंग बहोत ९३६,रा.देवळाली गाव) या नराधमाला विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश डी.डी. देशमुख यांनी दहा वर्षांचा सश्रम कारावास व तेरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा गुरूवारी (दि.१६) सुनावली.
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवळाली गावातील सार्वजनिक शौचालयाजवळ एक अल्पवयीन मुलगी १३ ऑक्टोबर २०१७ रोजी एकटीच आली होती. तिच्या अज्ञानाचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपी बहोत याने हाताने तिचे तोंड दाबले. तिला बळजबरीने शौचालयात ओढून नेत दोरीने हात बांधून टाकत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करत मारहाणसुद्धा केली होती. याबाबत कुठेही वाच्यता केली व घरी कोणालाही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारून टाकेन अशी, धमकीही बहोत याने पिडित बालिकेला दिली होती. याप्रकरणी पिडितेच्या वतीने तिच्या आईने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बहोतविरुद्ध बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक एस.डी.तेली यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत बहोत यास गुन्हा घडल्यापासून सात दिवसांत अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्यास आठवडाभराची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. सबळ परिस्थितीजन्य पुराव्यांची शृंखला जोडून तेली यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाचा कारावासदेखील भोगावा लागू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयात दहा साक्षीदारांची तपासणी
गुरुवारी झालेल्या अंतीम सुनावणीत सरकारपक्षाकडून ॲड. दीपशिखा भिडे यांनी दहा साक्षीदार तपासले व सरकार पक्षाकडून युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत फिर्यादीची साक्ष, पंचांची साक्ष व साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी तेली यांनी सादर केलेले सबळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्याअधारे बहोत यास दोषी धरले. त्यास तेरा हजार रुपये दंड व दहा वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली.