सरकारी वाहनातून आरोपी पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 23:53 IST2020-10-29T23:52:02+5:302020-10-29T23:53:37+5:30
आरोपीला घेऊन गोखले हायस्कूल, खारघर येथे जात असताना सरकारी वाहनातून पळ काढून आरोपी पसार झाला आहे. अरमान मुक्तार मोहम्मद (वय १९, रा. भांडुप पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे.

सरकारी वाहनातून आरोपी पळाला
नवीन पनवेल : आरोपीला घेऊन गोखले हायस्कूल, खारघर येथे जात असताना सरकारी वाहनातून पळ काढून आरोपी पसार झाला आहे. अरमान मुक्तार मोहम्मद (वय १९, रा. भांडुप पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे.
रिमांडकामी पोलीस हवालदार भास्कर माळवे हे चार आरोपींना घेऊन मुलुंड न्यायालय येथे रवाना झाले. या आरोपींना न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांना पोलीस तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे घेऊन गेले. आरोपी अरमान मुक्तार मोहम्मद याचे नाव मेडिकल पेपर आणि कोविड रिपोर्टवर चुकले असल्याने त्याला घेऊन पोलीस सरकारी वाहनात थांबले होते.
इतर तीन आरोपींना गोखले हायस्कूल, खारघर कारागृहात जमा करीत असताना अरमानने चलाखीने हातातील बेडीमधून हात काढून घेतला. या वेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने माळवे यांच्या छातीवर लाथ मारली आणि गाडीच्या बंद दरवाजाच्या उघड्या काचेच्या खिडकीतून बाहेर उडी मारून तो पळून गेला. त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.