नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:53 IST2019-11-20T19:51:00+5:302019-11-20T19:53:26+5:30
पाचपावली पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सौंदरकर (५३) यांचे बुधवारी दुपारी १.१५ वाजता उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. १३ नोव्हेंबरच्या रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता.

नागपुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सौंदरकर (५३) यांचे बुधवारी दुपारी १.१५ वाजता उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. १३ नोव्हेंबरच्या रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पाचपावली पोलीस ठाण्यातील ड्यूटी आटोपून सौंंदरकर आपल्या दुचाकीने (एमएच ४०/व्हीयु ३५६९) घराकडे परत जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चिंतामणी गोटेफोडे या दुचाकीचालकाची (एमएच ३१/ईटी ४४१३) समोरासमोर धडक बसली. हा अपघात जुना काटोल नाका चौकातील एका वळणाजवळ घडला. मेंदूला जबर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते बेशुद्धावस्थेतच होते. वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एसआरपीएफमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले लहान भाऊ भरत आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.