नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:48 PM2020-02-07T23:48:55+5:302020-02-07T23:51:14+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक नरेश पोलानी (वय ५७) यांना एसीबीच्या पथकाने ६० हजारांची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले.

ACB's trapped in Nagpur RTO: Motor vehicle inspector arrested | नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद

नागपूर आरटीओत एसीबीची झडप : मोटर वाहन निरीक्षक जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्दे६० हजारांच्या लाचेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक नरेश पोलानी (वय ५७) यांना एसीबीच्या पथकाने ६० हजारांची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले.
यातील तक्रारदार इंदोर (मध्यप्रदेश) येथील आजादनगरातील रहिवासी आहे. एका ट्रॅव्हल्स कंपनीत ते व्यवस्थापक असून, त्या कंपनीच्या ट्रॅव्हल्स इंदोर ते नागपूर मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. पोलानी खुर्सापार चेक पोस्टवर कार्यरत असताना त्यांच्या नजरेत या कंपनीच्या बसेस आल्या. त्यांनी विविध मुद्यांना अधोरेखित करून या मार्गावर पाच बसेस चालविण्यासाठी ८० हजार रुपये महिना एन्ट्री फी मागितली. तडजोडीअंती हा सौदा ६० हजारात पक्का करण्यात आला. मात्र, महिन्याला एका बसचे १२ हजार रुपये मागितले जात असल्याने आणि ते जास्त वाटत असल्याने ट्रॅव्हल्स कंपनीच्या मंडळींनी पुन्हा रक्कम कमी करण्याची मागणी केली. त्याला नकार दिल्यामुळे कंपनीच्या कार्यालयातील तक्रारदार व्यवस्थापकाने एसीबीच्या अधीक्षकांकडे शुक्रवारी सकाळी धाव घेतली. आरटीओ कार्यालयावर अनेक दिवसांपासून नजर ठेवून असणाऱ्या एसीबीसाठी ही आयती संधी होती. वेळ घालविल्यास संधी दवडली जाण्याची भीती असल्याने त्यांची लगेच तक्रार नोंदवून घेण्यात आली. या तक्रारीची तेवढ्याच तत्परतेने शहानिशा करण्यात आली. पोलानी यांनी ६० हजारांची रक्कम पंचासमक्ष मागितल्याने एक भक्कम पुरावा एसीबीला मिळाला. त्यामुळे एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तक्रार करणाराने रक्कम देण्याची तयारी दाखवून कधी आणि कुठे यायचे, अशी विचारणा केली. पोलानीने आपल्या अमरावती मार्गावरील गिरीपेठमध्ये असलेल्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, ६० हजार रुपये घेऊन तक्रारदार आणि त्याच्यापासून काही अंतरावर एसीबीच्या पथकातील मंडळी आरटीओ कार्यालयात पोहचली. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पोलानीने ही लाचेची रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने बाजूला असलेल्या एसीबीच्या मंडळींना इशारा केला. त्याचक्षणी एसीबीच्या पथकाने पोलानींवर झडप घेऊन त्यांना जेरबंद केले. या कारवाईमुळे एसीबीत प्रचंड खळबळ निर्माण झाली. कारवाईची कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर एसीबीने नंतर पोलानीच्या हजारीपहाड येथील निवासस्थानी पथक पाठविले.
एसीबीचे पथक तेथे रात्रीपर्यंत झाडाझडती घेत होते. तेथे काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. पोलानीविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, हवलदार प्रवीण पडोळे, सुनील कळंबे, नायक प्रभाकर बले, लक्ष्मण परतेती, वकील शेख आदींनी ही कारवाई केली.

निवृत्तीला काही महिने शिल्लक
पोलानीला एसीबीने पकडल्याच्या वृत्ताने प्रादेशिक परिवहन विभागात खळबळ निर्माण झाली आहे. पोलानींच्या निवृत्तीला तीन ते चार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अशात ते एसीबीकडून पकडले गेल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आरटीओतील अनेकांचे धाबे दणाणले आहे.

 

Web Title: ACB's trapped in Nagpur RTO: Motor vehicle inspector arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.