पंजाब रक्ताळले! लग्नात आपच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या; १२ दिवसांत तिसऱ्या नेत्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:15 IST2026-02-18T19:06:24+5:302026-02-18T19:15:55+5:30

पंजाबमध्ये आखणी एका आप नेत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

AAP Sarpanch Shot Dead During Wedding Celebrations in Punjab Tarn Taran | पंजाब रक्ताळले! लग्नात आपच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या; १२ दिवसांत तिसऱ्या नेत्याचा बळी

पंजाब रक्ताळले! लग्नात आपच्या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या; १२ दिवसांत तिसऱ्या नेत्याचा बळी

Punjab Crime: पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरन तारन जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्यात आम आदमी पार्टीचे विद्यमान सरपंच हरपिंदर सिंह यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सरपंच स्टेजवर डान्स करत होते. या हल्ल्यात त्यांचा चुलत भाऊही गंभीर जखमी झाला असून पंजाबमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विवाह सोहळ्यात रक्ताचा सडा

ठठियां महंतां गावाचे सरपंच हरपिंदर सिंह आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी सिद्धू फार्म हाऊस येथे गेले होते. स्टेजवर मित्रांसोबत डान्स करत असतानाच अचानक चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हरपिंदर सिंह यांच्या डोक्यात आणि पोटात चार गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

भावावरही गोळीबार

हरपिंदर सिंह यांचा चुलत भाऊ जर्मनजीत सिंह याने हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, नराधमांनी त्याच्यावरही गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला अमृतसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विवाह सोहळ्यात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला.

रेकी करूनच केला हल्ला

घटनेची माहिती मिळताच एसएसपी सुरिंदर लांबा यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोरांनी पूर्ण रेकी करून हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.

१२ दिवसांत ३ हत्या; पंजाब सरकारवर टीका

पंजाबमध्ये गेल्या १२ दिवसांत 'आप' नेत्याची झालेली ही तिसरी हत्या आहे. ६ फेब्रुवारी रोजी तरन तारनच्याच चीमा खुर्द गावात सरपंच गुरभेज सिंह यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. त्याच दिवशी जालंधरमध्ये आप नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता हरपिंदर सिंह यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिन्याभरात झालेल्या या हत्यांमुळे विरोधकांनी भगवंत मान सरकारला धारेवर धरले असून राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला आहे.

Web Title : पंजाब लहूलुहान: शादी में आप नेता की गोली मारकर हत्या; 12 दिनों में तीसरा

Web Summary : पंजाब में, आप के हरजिंदर सिंह की शादी में हत्या कर दी गई। बंदूकधारियों ने सिंह को नाचते समय गोली मार दी। यह बारह दिनों में पंजाब में मारे गए तीसरे आप नेता हैं, जिससे कानून और व्यवस्था के बारे में चिंता बढ़ गई है।

Web Title : Punjab Bleeds: AAP Leader Shot Dead at Wedding; Third in 12 Days

Web Summary : In Punjab, AAP's Harjinder Singh was murdered at a wedding. Gunmen fatally shot Singh while he danced. This marks the third AAP leader killed in Punjab within twelve days, raising concerns about law and order.