एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:16 IST2025-12-25T15:15:53+5:302025-12-25T15:16:31+5:30
एक तरुणी लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होती. मॅट्रिमोनियल साईटवर तिची ओळख या तरुणाशी झाली होती.

AI Generated Image
लग्न जमवण्यासाठी आजकाल अनेक तरुण-तरुणी मॅट्रिमोनियल साईट्सचा आधार घेतात. मात्र, याच साईट्सवर फसवणुकीचे जाळे विणणारे भामटेही सक्रिय झाले आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली असून, एका भामट्याने स्वतःला 'एसबीआय मॅनेजर' सांगून लग्नाचे आमिष दाखवले आणि प्रत्यक्ष भेटीदरम्यान तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास करून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विश्वासासाठी पाठवली 'सॅलरी स्लिप'
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यातील गर्दनीबाग परिसरात राहणारी एक तरुणी लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात होती. मॅट्रिमोनियल साईटवर तिची ओळख एका तरुणाशी झाली. या तरुणाने आपले नाव सांगून आपण पाटणा येथीलच रहिवासी असल्याचे भासवले. इतकेच नाही तर, तरुणीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आपण 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे खोटे सांगितले. पुरावा म्हणून त्याने तरुणीला व्हॉट्सॲपवर एक बनावट सॅलरी स्लिपही पाठवली होती. यामुळे तरुणीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला.
गांधी मैदानात गाठले आणि...
दोघांमध्ये काही दिवस फोनवर संवाद झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याचे ठरवले. भेटीसाठी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदान निश्चित करण्यात आले. ठरल्याप्रमाणे तरुणी तिथे पोहोचली. दोघेही एका बाकावर बसून भविष्यातील लग्नाच्या गप्पा मारत होते. मात्र, याच वेळी त्या तरुणाने आपली खरी वृत्ती दाखवली. गप्पांच्या ओघात संधी मिळताच त्याने तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि लॉकेट हिसकावले आणि बाहेर उभ्या असलेल्या आपल्या स्कूटीवरून वेगाने पळ काढला.
तक्रार केल्यावर फोनवर देतोय शिवीगाळ
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी सुन्न झाली. तिने आरडाओरडा केला, पण तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, लूट केल्यानंतर पीडित तरुणीने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, तो आरोपी फोनवर तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावत आहे.
पोलीस तपास सुरू
याप्रकरणी पीडित तरुणीने गांधी मैदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी फसवणूक आणि लुटीचा गुन्हा दाखल केला असून गांधी मैदान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मॅट्रिमोनियल साईटवर दिलेली माहिती आणि त्याने पाठवलेली कागदपत्रे यांच्या आधारे पोलीस या लुटारू नवरदेवाचा शोध घेत आहेत.