पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:30 IST2025-08-11T12:27:45+5:302025-08-11T12:30:56+5:30
एका तरुणाला विषारी किडा चावल्याने त्याचा मृत्यू झाला, पण अंधश्रद्धेमुळे कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला.

पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
एका तरुणाला विषारी किडा चावल्याने त्याचा मृत्यू झाला, पण अंधश्रद्धेमुळे कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी या तरुणाचा मृतदेह तब्बल पाच दिवस पाण्यात ठेवला. इतकंच नाही तर, त्याच्या बाजूला बसून बँड वाजवत बसले. उत्तर प्रदेशच्या कासगंजमधून हा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
कासगंज जिल्ह्यातील अमांपुर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बीनपुरा गावात ही घटना घडली. ५ ऑगस्ट रोजी २६ वर्षीय तरुणाचा विषारी किड्याच्या चाव्याने मृत्यू झाला, पण कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तो मृत असल्याचे मान्य केले नाही. त्यांनी तांत्रिक आणि मांत्रिकांच्या मदतीने त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी त्यांनी अघोरी प्रकार करण्यास सुरुवात केली.
अंधश्रद्धेचा खेळ पाच दिवस होता सुरू
पश्चिम बंगालहून आलेल्या एका महिलेने या तरुणाला जिवंत करण्यासाठी पाच दिवस अंधश्रद्धेचा खेळ केला. महादीपक असे त्या तरुणाचे नाव असून ५ ऑगस्टच्या रात्री झोपेत असताना त्याला विषारी किड्याने चावा घेतला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, पण कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्यासाठी बंगालहून एका तांत्रिकांना बोलावले. या तांत्रिकेने खड्ड्यात पाणी भरून त्यात तरुणाचा मृतदेह ठेवला आणि ढोल, थाळी वाजवून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करत राहिली.
पाच दिवस हा अंधश्रद्धेचा खेळ सुरू होता. संपूर्ण गाव या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसही या प्रकरणात हस्तक्षेप करू शकले नाहीत. पाचव्या दिवशी तांत्रिकांने हा तरुण मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.