२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:44 IST2025-08-14T15:44:03+5:302025-08-14T15:44:26+5:30
या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते.

AI Generated Image
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे एका महिलेने २ चिमुकल्यांना घेऊन नदीत उडी मारली आहे. ही महिला आधी पूलावर पोहचली. तिथे अंगावरील दागिने आणि मोबाईल एका कपड्यात बांधून बाजूला ठेवला. त्यानंतर मोठ्या मुलाला नदीत फेकले. त्यानंतर ४ वर्षाच्या मुलाला उचलून तिने पुलावरून खाली नदीत उडी घेतली. जवळपास १८ तासांनी या तिघांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. त्यात ४ वर्षाच्या छोट्या मुलाचा मृतदेह घटनास्थळापासून १० किमी अंतरावर तर मोठा मुलगा आणि आईचा मृतदेह १०० मीटर अंतरावर सापडला आहे.
बुधवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. त्यात महिलेने तिच्या सासू-सासरे आणि दीरावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या पतीचे १ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दीरासोबत महिलेने लग्न केले होते. या महिलेने नोटमध्ये लिहिले होते की, माझ्या घरी सासू सासरे गेल्या १५ दिवसांपासून हुंड्याच्या मागणीसाठी रोज वाद घालत आहेत. दागिने आणि २ लाख रुपये दिले नाही तर मुलांना घेऊन घरातून निघून जा अशी धमकी दिली. माझ्या पतीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर मी दीराशी लग्न केले होते. या तिघांनी मिळून माझ्या पतीचा पैसा हडपला आणि आम्हाला घरातून पळवले असा आरोप तिने केला.
याच कारणाने मी गोमाता नदीत उडी घेत आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता सासरे बाबूलाल आणि सासू कुंती देवी यांनी मज्जा करावी. मी आणि माझ्या मुलांमुळे घरच्यांना अडचण व्हायची. ही सुसाईड नोट मी माझ्या हाताने लिहून फेसबुकवर टाकत आहे असं तिने नोटमध्ये शेवटी लिहिले आहे. ७ वर्षापूर्वी मिथिलेश कुमार या महिलेचे बाबूलाल यांचा मोठा मुलगा हुकुमसोबत लग्न झाले होते. या दोघांना ६ वर्षीय अभय यादव आणि ४ वर्षीय अंश यादव अशी मुले होती. एक वर्षापूर्वी आजारामुळे पती हुकुम यांचा मृत्यू झाला. ३ महिन्यापूर्वी मिथिलेशने दीर भोलासोबत लग्न केले होते. परंतु १५ दिवसांपासून सासू-सासरे आणि पती भोला मिळून हुंड्यासाठी छळ करत असल्याचं नोटमध्ये उल्लेख आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजता कुणालाही न सांगता सून मिथिलेश दोन मुलांना घेऊन घरातून निघाली. तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला परंतु काही कळले नाही. त्यानंतर गुरुवारी घरापासून ८ किमी अंतरावरील गोमाता नदीच्या पुलावरून महिलेने मुलांना घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून कळले असं सासरे बाबूलाल यांनी सांगितले.