विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
By नरेश डोंगरे | Updated: April 28, 2025 22:45 IST2025-04-28T22:43:59+5:302025-04-28T22:45:47+5:30
वर्षभरात आरपीएफकडून ६४ प्रकरणांमध्ये 'अँक्शन मोड'

विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विविध रेल्वे गाड्यांमधून मद्यतस्करी होत असल्याची कुणकुण लागल्याने सतर्क असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी वर्षभरात ‘ऑपरेशन सतर्क’अंतर्गत तब्बल ६४ वेळा कारवाई केली. या कारवाईत ९ हजार ८५७ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे, रेल्वेतून नागपूरमार्गे कोट्यवधींच्या हवालाची रक्कम आणि माैल्यवान चिजवस्तूंचीही तस्करी केली जाते. मात्र, त्यासंबंधाने कारवाईचे प्रमाण नगण्य आहे.
भारतीयांची लोकवाहिनी म्हणून रेल्वेची ओळख आहे. समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिक प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. याच रेल्वेचा काही समाजकंटक, गुन्हेगार आणि तस्करही पद्धतशीर वापर करतात. कुणी दारू, कुणी गांजा तर कुणी कुठल्या दुसऱ्या अमली पदार्थांची रेल्वेतून बेमालूमपणे तस्करी करतात. रेल्वेचा अवैध धंद्यासाठी वापर करून घेणाऱ्यांमध्ये मद्यतस्कर सर्वांत आघाडीवर आहेत. अनेकदा हे तस्कर आरपीएफ किंवा जीआरपी(रेल्वे पोलिस)च्या समोरून निघून जातात. मात्र, त्यांचा थांगपत्ता आरपीएफ किंवा जीआरपीला लागत नाही. तथापि, बरेचदा हे तस्कर पकडलेही जातात.
गेल्या वर्षभरात अशाचप्रकारे मद्यतस्करी होत असल्याची कुणकुण लागल्याने सतर्क असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वेत तब्बल ६४ वेळा कारवाई केली. या कारवाईत ९ हजार ८५७ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांची बाजार भावाप्रमाणे किंमत १२ लाख, ४० हजार रुपये आहे. या ६४ प्रकरणात आरपीएफने ३६ मद्यतस्करांना अटक केली. अनेक जण मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.
मध्य प्रदेशातील मद्य
मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात बनावट दारू निर्मितीचे अड्डे आहेत. या अड्ड्यावर वेगवेगळ्या प्रकारची दारू तयार केली जाते आणि ब्रॅण्डेड कंपनीच्या दारूच्या बाटल्यासारख्याच दिसणाऱ्या बाटल्या आणि लेबल चिपकवून त्यांची विक्री केली जाते. मध्य प्रदेशाच्या तुलनेत या बनावट दारूच्या बाटल्यांची किंमत फारच कमी असते. त्यामुळे मध्य तस्कर या दारूच्या बाटल्या तेथून विकत घेऊन रेल्वेने नागपुरात आणतात आणि त्या विविध शहरांतील काही बार, रेस्टॉरंट तसेच महामार्गावर असलेल्या ढाब्यांवर विकतात. ही मंडळी नंतर ती बनावट दारू ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा किंमत घेऊन त्यांना विकतात.
सोन्या-चांदीचीही होते तस्करी
रेल्वेतून वेगवेगळ्या अमली पदार्थांची तस्करी होतेच मात्र सोन्याचांदीचीही मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. दिल्ली, अमृतसर (पंजाब), रायपूर (छत्तीसगड) आणि जळगावसह अन्य काही ठिकाणांहून सोन्या-चांदीची तस्करी करण्यात येते. एवढेच नव्हे तर नागपूर मार्गे रेल्वे गाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर ‘हवाला’च्या रकमेचीही हेरफेर केली जाते. या संबंधातील कारवाईचे प्रमाण मात्र फारच अत्यल्प आहे, हे विशेष !