१९ व्या मजल्यावरून घेतली उडी ; परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची ठाण्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 19:22 IST2022-03-27T18:46:50+5:302022-03-27T19:22:42+5:30
Suicide Case : याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

१९ व्या मजल्यावरून घेतली उडी ; परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याची ठाण्यात आत्महत्या
ठाणे: दहावीच्या परीक्षेच्या तणावातून ठाण्याच्या नीळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून स्वत:ला झोकून देऊन ओम मनीष मिश्र (१५) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या ओम याची सध्या शालांत परीक्षा सुरू होती. तो २६ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर देऊन तो घरी परतला होता. आपल्या १९ व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीत तो उभा असतांना आजचा विज्ञानाचा पेपर चांगला गेला नसल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या टर्मला मात्र मी चांगला अभ्यास करुन पेपर देईल, असेही तो सांगत होता. नंतर वडिलांनी त्याची समजूत घालण्यापूर्वीच त्याने तणावातून आई वडिलांसमोरच १९ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
खाली कोसळल्यानंतर त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जवळच्याच टायटन या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्न, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मिश्रा कुटूंबियांचा एकूलता एक मुलगा अशाप्रकारे मृत पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.