मैत्रीला काळिमा! पतीच्या जीवाभावाच्या मित्रासोबत पत्नीचे सूत जुळले; दोघांनी मिळून अमितला असे संपवले की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:46 IST2026-02-16T14:45:58+5:302026-02-16T14:46:45+5:30
ज्या मित्राला आपला मानून घराची दारे उघडली, त्यानेच विश्वासघाताचा कळस गाठत मित्राच्या संसाराची राखरांगोळी केली आहे.

मैत्रीला काळिमा! पतीच्या जीवाभावाच्या मित्रासोबत पत्नीचे सूत जुळले; दोघांनी मिळून अमितला असे संपवले की...
ज्या मित्राला आपला मानून घराची दारे उघडली, त्यानेच विश्वासघाताचा कळस गाठत मित्राच्या संसाराची राखरांगोळी केली आहे. उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यात अवैध संबंधातून एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती गाढ झोपेत असतानाच या कलयुगी पत्नीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेने संपूर्ण लंभुआ परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
मैत्रीत केला घात
मिळालेल्या माहितीनुसार, मदनपुर पनियार गावातील रहिवासी अमित सिंह हे व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर होते. त्यांचा मित्र दीपक हा देखील त्याच व्यवसायात होता. अमितचा दीपकवर प्रचंड विश्वास असल्याने त्याचे अमितच्या घरी सतत येणे-जाणे होते. मात्र, याच काळात अमितची पत्नी शिल्पी सिंह आणि दीपक यांच्यात सूत जुळले. मैत्रीच्या आड सुरू असलेल्या या अवैध संबंधांची कुणकुण जेव्हा अमितला लागली, तेव्हा घरात मोठे वाद झाले होते. मात्र, प्रेमात आंधळ्या झालेल्या या दोघांनी अमितलाच रस्त्यातून हटवण्याचा भयानक कट रचला.
मध्यरात्री रक्ताचा सडा...
शनिवारी रात्री अमित घरी गाढ झोपेत असताना ही थरारक घटना घडली. दीपक आधीच अमितच्या घरी दबा धरून बसला होता. मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून शिल्पी आणि दीपकने झोपलेल्या अमितवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की अमितला प्रतिकार करण्याची साधी संधीही मिळाली नाही आणि जागीच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
पोलिसांची मोठी कारवाई
घटनेची माहिती मिळताच लंभुआ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले आहेत. सुल्तानपूरच्या पोलीस अधीक्षक चारू निगम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, फरार मुख्य आरोपी दीपकच्या अटकेसाठी चार विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपी पत्नी शिल्पीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरू आहे.