रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:00 IST2026-04-06T16:56:39+5:302026-04-06T17:00:13+5:30
Umpire Stabbed To Death: क्रिकेटचा सामना सुरू असताना रन आऊटच्या निर्णयावरून दोघांमध्ये वाद झाला. पंचांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद सोडवला आणि त्याचाच राग अनावर झाल्याने एकाने चाकूचे सपासप वार करत अंपायरचीच हत्या केली.

रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Cricket Crime news: क्रिकेट खेळताना अनेकदा वाद होतात. हाणामाऱ्याही होतात. पण, एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान शुल्लक वादातून रक्ताचा सडाच पडला. क्रिकेट सामन्यादरम्यान दोघांमध्ये रन आऊटच्या निर्णयावरून वाद झाला. अंपायरने त्यांच्यात मध्यस्थी करत वाद सोडवला. पण, त्याचा राग सामना बघणाऱ्या एका प्रेक्षकाला आला, त्याने दोन्ही अंपायरवर चाकूने वार केले. यात एका अंपायरचा मृत्यू झाला, तर दुसरा अंपायर जखमी झाला आहे. तर भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असलेला तरुणही जखमी झाला आहे.
ही घटना आंध्र प्रदेशातील विशाखापटनममध्ये घडली आहे. रविवारी सायंकाळी स्थानिक मैदानावर तीन संघांमध्ये सामने झाले. डोला अजित बाबू आणि बुदूमुरी चिरंजीवी हे दोघे सामन्यात पंच होते. त्यांनी मध्यस्थी करत वाद सोडवला.
मैदानावर वाद मिटला, पण प्रेक्षकाने...
अजित बाबू आणि चिरंजीवी यांनी मैदानावर दोन खेळाडूंमध्ये सुरू झालेलं भांडण सोडवलं. पण, या सगळ्याचा सामना बघत असलेल्या एका प्रेक्षकाला राग आला. त्याने अंपायर आणि खेळाडूंना शिवीगाळ केली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी कांता किशोर (वय २६) याने नंतर दोन्ही पंचांना झालेला वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावले. सामना संपल्यानंतर अजित बाबू, चिरंजीवी आणि काही इतर मित्र विनंतीनुसार त्याला एका ठिकाणी भेटायला गेले.
भेटल्यानंतर पुन्हा सुरू झाला वाद
दोन्ही पंच आणि त्यांच्यासोबतच्या तरुणासोबत कांता किशोर आणि त्याच्यासोबतच्यांचे भांडणं सुरू झाले. वाद वाढल्यानंतर कांता किशोरला राग अनावर झाला आणि त्याने चाकू काढत सपासप दोन्ही पंचांवर वार केले. यात एका पंचाच्या छातीतच चाकूचे वार झाले आणि तो तरुण जागेवरच खाली पडला.
कांता किशोरच्या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न चिरंजीवीने केला, पण त्याला ही जखमा झाल्या. तो रक्तबंबाळ अवस्थेत पळत सुटला. तर वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुणांपैकी एक जण जखमी झाला. अजित बाबू याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जो खेळाडू नव्हता त्यानेच केली हत्या
मयत अजित बाबूच्या भावाने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहे. तो म्हणाला की, जवळच एका कॉलनीमध्ये राहणाऱ्या तरुणाने ही हत्या केली आहे. तो तरुण खेळाडूही नाही. पण, तो या भांडणात मुद्दाम आला आणि त्याने खेळाडूंना शिव्या दिल्या. त्यानंतर मद्यपान करून आला आणि हत्या केली.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.