नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:12 IST2025-08-22T15:12:17+5:302025-08-22T15:12:32+5:30

एका २८ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. महिलेने पतीला जेवणात झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात दिल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

A plot was hatched to kill her husband, her boyfriend also joined in; but 'that' WhatsApp message exposed the wife's plot! | नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!

नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!

आसाममधील कछार जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका २८ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पतीला जेवणात झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात दिल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कबरीमधून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

निवडणुकीतील विजयानंतर घडली घटना
या घटनेतील मृताचं नाव इमरान हुसैन बरभुइया (३८) असं आहे. ते नुकतेच ग्रामपंचायत निवडणूक जिंकून राजनगर-खुलीछडा पंचायतचे अध्यक्ष झाले होते. ११ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि कुटुंबीयांनी तो हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ ऑगस्टला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र, मृताचा भाऊ नजीब बरभुइया यांना काही संशय आला. त्यांनी २० ऑगस्टला ढोलाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.

अवैध संबंध आणि हत्येचं कटकारस्थान
ढोलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी कुलेंद्र हुझुरी यांनी सांगितलं की, मृतदेह सिलचर मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सिलचर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृताची पत्नी रीना बेगम (२८) आणि बशीर-उज्जमान लष्कर उर्फ बिजू (३३) यांना अटक केली आहे. बिजू हा इमरानच्या गाडीचा चालक होता.

मृताचा भाऊ नजीब यांनी आरोप केला आहे की, रीना आणि बिजू यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. ११ ऑगस्टच्या रात्री बिजूने झोपेच्या गोळ्या आणल्या, ज्या रीनाने इमरानच्या जेवणात मिसळल्या. इमरानचा घरीच मृत्यू झाला.

नजीब सांगतात की, त्यावेळी रीनाने इमरानचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं, पण चार दिवसांनंतरच तिने संपत्तीत वाटा मागितला, त्यामुळे त्यांचा संशय अधिक वाढला.

व्हॉट्सॲप चॅटमधून कट उघड
नजीब आणि त्यांच्या मित्रांनी या प्रकरणाची गुपचूप चौकशी केली असता, रीना आणि बिजू यांच्यात झालेल्या व्हॉट्सॲप चॅटमधील संभाषण समोर आलं. एका चॅटमध्ये रीनाने लिहिलं होतं की, 'आतापर्यंत मृतदेह सडून गेला असेल, काळजी करू नकोस.' या मेसेजमुळे हत्येचं कटकारस्थान आणि परदेशात पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन उघड झाला. पोलिसांनी जेव्हा बिजूची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने सर्व सत्य सांगितलं.

गावकऱ्यांमध्ये संताप
या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी बिजू आणि तीन लोकांना मारहाण केली. त्यांची गाडीही फोडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून त्यांची सुटका केली आणि त्यांना ताब्यात घेतलं.

सोमवारी सुमारे ५०० गावकऱ्यांनी ढोलाई पोलीस ठाण्यासमोर रोड जाम केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांच्या आश्वासनानंतरच गावकरी शांत झाले.

नजीब यांनी सांगितलं की, हत्येमागचं मुख्य कारण ६० लाख रुपये होतं. इमरानने जमीन खरेदी करण्यासाठी ही रक्कम घरी ठेवली होती. ही माहिती रीनाने बिजूला दिली आणि मग दोघांनी मिळून हत्येचा कट रचला. गावकऱ्यांनीही सांगितलं की, इमरानला पत्नी आणि चालकाच्या संबंधांवर संशय होता. इमरानने बिजूला कामावरून काढूनही टाकलं होतं, पण बिजूच्या आईच्या विनंतीमुळे त्यांनी त्याला पुन्हा कामावर ठेवलं. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: A plot was hatched to kill her husband, her boyfriend also joined in; but 'that' WhatsApp message exposed the wife's plot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.