Lucknow Crime: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आपल्याच पोटच्या मुलीला मारणाऱ्या रोशनी उर्फ नाजबाबत एक नवीन खुलासा समोर आला आहे. ज्या मुलीचा तिने वाढदिवस साजरा केला, तिलाच तिनं संपवल्याचे कारण समोर आले आणि पोलिससुद्धा चक्रावले. घरात वडील नसताना ६ वर्षांची सायनारा उर्फ सोनीने तिची आई रोशनीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर मुलीने मी बाबांना या प्रकाराबाबत सर्व काही सांगेन असं आपल्या आईला सांगितले तेव्हा आई घाबरली. तिने मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा तिने नकार दिला तेव्हा आईने पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला. या खूनात तिच्या बॉयफ्रेंडनेही मदत केली. मग दोघांनीही चिमुकलीचा मृतदेह बेडवर ठेवला.
या खूनानंतर आरोपी रोशनीने तिचा प्रियकर उदित जयस्वालसोबत त्याच बेडवर मद्यपान करत पार्टी केली. त्यांनी ड्रग्ज घेतले. नंतर तीही त्याच बेडवर झोपली. जेव्हा मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा तिने तो बाहेर काढला. मृतदेह एसीजवळ ठेवला आणि वास येऊ नये म्हणून भरपूर परफ्यूम लावला. रोशनीने पोलिसांना फोन केला आणि म्हणाली माझ्या पतीने माझ्या मुलीची हत्या केली आणि पळून गेला आहे असा बनाव केला. पण तिचं हे खोटं लगेचंच पकडलं गेलं. पोलिसांनी जेव्हा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना कळलं हा मृतदेह बराचवेळ पासून असाच आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अहवालातून समोर आले की ही हत्या ३६ तास आधीच झाली आहे त्यावेळी पोलिसांना संशय आला.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. त्यांना मृत मुलीचे वडील शाहरुखची माहिती देखील मिळाली. मुलीची हत्या झाली तेव्हा शाहरुख त्याच्या बहिणीच्या घरीच होता हे उघड झाले. इतकेच नाही तर ही हत्या चौथ्या मजल्यावर झाली शाहरुख तिथेही आला नव्हता. पोलिसांनी रोशनी आणि तिचा प्रियकर उदितलाही अटक केली.
बॉयफ्रेंडनं सांगितला थरारक प्रकार
पोलिस चौकशीदरम्यान रोशनीचा प्रियकर उदित जयस्वाल यांन घाबरून सर्व काही सांगितलं, त्यानं सांगितलेली कहाणी भयानक होती. तो म्हणाला- रोशनीने तिच्या मुलीची हत्या केली आहे यात माझाही सहभाग होता. शनिवारी रात्री सोनीने आम्हा दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यानंतर ती म्हणत होती की, ती तिच्या वडिलांना सगळं सांगेल. आम्ही तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात आम्ही तिला मारहाण केली. जेव्हा ती ओरडू लागली तेव्हा रोशनीने तिच्या मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर तिने मृतदेह बेडवर ठेवला.
मग आम्ही दोघांनी तिथेच एकाच खोलीत दारू पिण्याची पार्टी केली. जेव्हा मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागली तेव्हा आम्ही तो बाहेर काढला आणि एसीजवळ ठेवला. त्यावर परफ्यूम स्प्रे केला आणि खोली फिनायलने धुतली. आम्ही दोघांनीही त्यावेळी ड्रग्ज घेतले होते. त्यानंतर आम्ही रात्री शाहरुखला अडकवण्याचा प्लॅन बनवला. रोशनीने शाहरुखला फोन केला. मग तो भांडून तिथून निघून आला. त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करून सांगितले की, शाहरुखने सोनीला मारले आहे. मात्र ही घटना चौथ्या मजल्यावर घडली होती, शाहरुख तिथे गेला नव्हता. घटनेच्या दिवशी तो त्याच्या बहिणीच्या घरी होता हे पोलिसांनी तपास केला तेव्हा असे आढळून आले. सध्या हे दोन्ही आरोपी तुरुंगात आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.