स्वत:ला मृत सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची केली हत्या, डीएनए रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 18:37 IST2022-05-07T18:37:06+5:302022-05-07T18:37:29+5:30
Ghaziabad Crime News : या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पोलिसांनी मृतदेहाची डीएनए टेस्ट केली. चौकशीतून समोर आलं की, मृत व्यक्ती दुसराच कुणीतरी आहे.

स्वत:ला मृत सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची केली हत्या, डीएनए रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
Ghaziabad Crime News : दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादच्या निवाडी भागात एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे स्वत:ला मृत सिद्ध करण्यासाठी एक व्यक्ती तुरूंगातून बाहेर आली आणि मग पत्नी व मुलांसोबत मिळून एका अज्ञात व्यक्तीची हत्या केली. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा पोलिसांनी मृतदेहाची डीएनए टेस्ट केली. चौकशीतून समोर आलं की, मृत व्यक्ती दुसराच कुणीतरी आहे.
ही घटना गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, मेरठच्या कंकर खेडाहून अजय नावाच्या व्यक्तीला मुजफ्फरनगरच्या जानसठ पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात तुरूंगात पाठवलं होतं. ज्यानंतर तो जामीनावर तुरूंगातून बाहेर आला होता. शिक्षा भोगावी लागू नये म्हणून आरोपीने पत्नी आणि दोन मुलांसोबत मिळून एक प्लान केला.
त्यांच्या प्लाननुसार, एका व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्याची हत्या केली गेली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी अजयने त्याचे कपडे मृतदेहावर चढवले. त्यानंतर निवाडी भागात मृतदेह फेकून त्याच्या चेहरा आणि हात जाळले जेणेकरून त्याची ओळख पटू नये.
गाजियाबाद पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करता करता जेव्हा डीएनए टेस्ट केली तेव्हा समोर आलं की, मृतदेह अजयचा नाहीये. हा मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा आहे. सध्या पोलिसांनी आरोपी अजयच्या पत्नीला अटक केली आहे. तर आरोपी अजय आणि त्याची दोन मुलं फरार आहेत.
आरोपी अजयसहीत त्याच्या दोन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत. जेणेकरून हे समजू शकावं की, या लोकांनी मिळून ज्याची हत्या केली ती व्यक्ती कोण आहे?