दरड दुर्घटनेप्रकरणी चाळीच्या बिल्डरला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:20 IST2022-07-15T15:54:30+5:302022-07-15T16:20:43+5:30
Crime News :बुधवारी सकाळी जोरदार पावसात वसईच्या राजावली येथील वाघराळपाडा येथे अनधिकृत चाळींच्या लगतच असलेली दरड ठाकूर परिवाराच्या घरावर कोसळली होती.

दरड दुर्घटनेप्रकरणी चाळीच्या बिल्डरला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पोलिसांची कारवाई
नालासोपारा : वसईच्या राजावली येथील वाघराळपाडा दरड दुर्घटनेप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हयगयीने मृत्यू घडविणे या गुन्ह्यातील फरार चाळीच्या बिल्डरला गुरुवारी रात्री गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी कारवाई करत मुंबई येथून अटक केली आहे.
बुधवारी सकाळी जोरदार पावसात वसईच्या राजावली येथील वाघराळपाडा येथे अनधिकृत चाळींच्या लगतच असलेली दरड ठाकूर परिवाराच्या घरावर कोसळली होती. यात अमित ठाकूर (३५), वंदना अमित ठाकूर (३३), ओम अमित ठाकूर (१०) व रोशनी ठाकूर (१४) असे चौघे ढिगा-याखाली अडकले होते. यातून एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आई व मुलाला बाहेर काढून वाचवण्यात यश आले होते. तर बाप व लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर डोंगर पोखरून अनधिकृत चाळी बांधल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या.
मनपाच्या जी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त नीलम निजाई यांनी तक्रार देऊन बुधवारी संध्याकाळी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हयगयीने मृत्यू घडविणे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमला देण्यात आला आहे. गुरुवारी रात्री मुंबईच्या कांदिवली येथून आरोपी मेसर्स मितवा रियालीटी तर्फे अजित उर्फ मंटू सिंह (३५) या चाळ बिल्डरला अटक केले असून शुक्रवारी वसई न्यायालयात आरोपीला हजर करणार असल्याचे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी लोकमतला सांगितले.