एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:15 IST2025-11-19T11:15:23+5:302025-11-19T11:15:42+5:30
राहुलने नोव्हेंबर २०२४ मध्ये खुशबूसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर एका महिन्याने खुशबूला पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळलं.

एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
प्रयागराज - एका डिलिव्हरी बॉयने एकाचवेळी २ पत्नींना अंधारात ठेवले, एकीसोबत लव्ह मॅरेज तर दुसरीसोबत अँरेज मॅरेज करत त्याने दोघींसोबत संसार थाटला. जेव्हा या दोघींना पती विश्वासघात करत असल्याचा अंदाज आला तेव्हा त्यांनी फिल्मी अंदाजात त्याला पोलिसांच्या तावडीत पाठवले. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि २ लग्न केल्याच्या आरोपाखाली पतीला जेलमध्ये पाठवले आहे. सध्या या संपूर्ण प्रकाराची शहरात चर्चा सुरू आहे.
राहुल दुबे हा एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याने २ मुलींची फसवणूक केली आहे. ही घटना प्रयागराज येथील आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्या लग्नानंतर ही फसवणूक समोर आली. पत्नीला पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या लग्नाचे फोटो सापडले, त्यानंतर दोघींनी मिळून पतीला कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. राहुल कामासाठी कायम घराबाहेर असायचा. त्याने बॉलीवूड फिल्म घरवाली बाहरवालीच्या स्टोरीप्रमाणे २ लग्न केली. पहिले लग्न खुशबूसोबत केले, जिच्याशी त्याने लव्ह मॅरेज केले होते. दुसरे लग्न शिवांगीसोबत केले, जे त्याच्या घरच्यांनी लावून दिले. राहुलने एका पत्नीला शहरात आणि दुसरीला गावी ठेवले. परंतु ही गोष्ट तो जास्त काळ लपवू शकला नाही.
एका कॉलनं उघडली पोल
राहुलने नोव्हेंबर २०२४ मध्ये खुशबूसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर एका महिन्याने खुशबूला पतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळलं. खुशबूने एकेदिवशी राहुलच्या मोबाईलवर कॉल केला होता. तो कॉल दुसरी पत्नी शिवांगीने उचलला होता. शिवांगीने ती राहुलची पत्नी बोलतेय असं सांगितले. तेव्हा खुशबूने तिच्या लग्नाचा आणि मुलीच्या जन्माबाबत खुलासा केला. पुरावे म्हणून खुशबूने शिवांगीला लग्नाचे फोटो पाठवले. ज्यानंतर या तिघांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली.
दरम्यान, राहुलच्या २ लग्नाबाबत दोन्ही पत्नींना कळल्यानंतर दोघींनी त्याला जाब विचारला. त्यावेळी घरच्यांच्या दबावामुळे लग्न करावे लागले असं त्याने सांगितले. पहिली पत्नी खुशबूने राहुलवर आरोप केले आहेत. तो सातत्याने तिला सोडण्याची धमकी देत असून मुलीलाही स्वीकारण्यास तो तयार नाही. तर पतीने फसवणूक करून माझ्याशी दुसरं लग्न केले असा आरोप शिवांगीने केला आहे. दोन्ही पत्नींनी पोलीस ठाण्याचे दार ठोठावल्यानंतर राहुल दुबेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राहुलला अटक केली आहे.