बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:02 IST2025-11-18T12:01:03+5:302025-11-18T12:02:36+5:30
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा सुरू असताना जेडीयू समर्थक दोघांनी आरजेडी समर्थक भाच्याची हत्या केली.

बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
Crime News Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवले. या निकालाची देशभरात चर्चा झाली. अनेक शंकाही या निकालाबद्दल व्यक्त केल्या जात आहेत. याच निकालाबद्दल चर्चा करत असताना तिघांमधील वाद विकोपाला गेला आणि २२ वर्षीय भाच्याची दोन मामांनीच हत्या केली.
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. दोन्ही आरोपी आणि २२ वर्षीय तरुण मूळचे बिहारचे असून, तिघेही कामानिमित्त मध्य प्रदेशात राहत होते.
शंकर मांझी (वय २२) असे मयत तरुणाचे नाव असून, तो शिवहर जिल्ह्याचा रहिवासी आहे. गुना शहरात तो राजेश मांझी (वय २५), तुफानी मांझी (वय २७) यांच्यासोबत राहत होता.
राजद समर्थक विरुद्ध जेडीयू समर्थक
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही घटना घडली. १६ नोव्हेंबर रोजी तिघेही कामावरून घरी परतले. तिघेही दारू प्यायला बसले. राजेश मांझी आणि तुफानी मांझी हे नितीश कुमारांच्या जेडीयूचे समर्थक आहेत. तर शंकर मांझी हा तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा समर्थक होता.
दारु पित असताना तिघांमध्ये निकालाची चर्चा सुरू झाली. शंकर आणि त्यांच्या दोन मामांमध्ये वाद विवाद सुरू झाला. राजदची बाजू मांडत असल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही मामांना राग अनावर झाला.
चिखलात दाबले तोंड, शंकरचा घेतला जीव
वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही मामांनी शंकरला मारहाण केली आणि त्याला चिखल असलेल्या गड्ड्याजवळ घेऊन गेले. त्यांनी शंकरचे मुंडके चिखलात दाबले. त्यात श्वास गुदमरून शंकरचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघेही फरार झाले.
परिसरातील काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शंकरचा मृतदेह रुग्णालयात नेला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी राजेश आणि तुफानी यांना काही तासातच अटक केली. पोलीस चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.