ट्रक दुचाकी अपघातात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 21:02 IST2019-09-26T20:59:07+5:302019-09-26T21:02:36+5:30
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सकाळी ९.१५ वाजता सदर अपघात घडला.

ट्रक दुचाकी अपघातात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू
वास्को - गुरूवारी सकाळी सांत्रे, कुठ्ठाळीअंतर्गत रस्त्यावरून दुचाकीने जात असताना लुइजा फर्नांडीस या ७० वर्षीय वृद्ध महीलेच्या दुचाकीची धडक ह्याच मार्गाने जाणाऱ्या ट्रकवर बसून झालेल्या अपघातात ती जागीच ठार झाली. लुइजा हीच्या दुचाकीची ट्रकवर धडक बसल्यानंतर ती ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने तिचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती वेर्णा पोलीसांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सकाळी ९.१५ वाजता सदर अपघात घडला. कुठ्ठाळी भागात राहणारी ७० वर्षीय वृद्ध महीला लुइजा काही कामासाठी स्वता ‘प्लेजर’ दुचाकीने (क्र. जीए ०८ एस ७४२७) कुठ्ठाळी येथील रस्त्यावरून जात होती. यावेळी ह्याच मार्गाने येणारा ट्रक (क्र: जीए ०५ टी १११४) तिच्या दुचाकीला बाजूने धडकल्याने लुइजा रस्त्यावर पडल्याची माहीती पोलीसांनी देऊन ती त्या ट्रकच्या चाकाखाली सापडली. सदर अपघातात लुइजा जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करून मयत लुइजा हीचा मृतदेह बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला. सदर अपघातातील ट्रक चालक राजासाब नदाफ (वय ३०, मूळ महाराष्ट्रा) याला पोलीसांनी ह्या अपघाता प्रकरणात प्रथम ताब्यात घेतल्यानंतर अटक केली. अपघाताच्या वेळी सदर ट्रक खाली होता अशी माहीती पोलीसांनी देऊन ट्रकचालक राजासाब मागच्या काही काळापासून गोव्यातील धारबांदोडा भागात वास्तव्य करतो. वेर्णा पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.