6 years old girl dies in road accident | दाबोळी रस्त्यावरील अपघातात सहा वर्षीय मुलीचा दुर्देवी अंत

दाबोळी रस्त्यावरील अपघातात सहा वर्षीय मुलीचा दुर्देवी अंत

ठळक मुद्दे गीताची आई तेकी हीच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचे पोलीसांनी माहितीत सांगितले. वास्को पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ च्या आसपास सदर भीषण अपघात घडला.

वास्को - दाबोळी विमानतळासमोरील रस्त्यावर दुचाकी व चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या गीता ओली ह्या सहा वर्षीय बालिकेचा बुधवारी (दि. ६) सकाळी इस्पितळात उपचार घेत असताना मृत्यू झाला. गीता आपल्या आई व मामासहीत मंगळवारी (दि. ५) उशीरा रात्री ‘डीवो’ दुचाकीने जात असताना हा भीषण अपघात घडला. बायणा येथे राहणाऱ्या प्रेमचंद माली यांने ‘व्हॅगनार’ चारचाकी चुकीच्या मार्गाने भरफाम वेगाने आणून ‘डीवो’ दुचाकीला जबर धडक देऊन नंतर बाजूला पार्क करून ठेवलेल्या अन्य एका टॅक्सी चारचाकीला धडक दिल्याची माहीती पोलीसांकडून उपलब्ध झाली आहे.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री १२ च्या आसपास सदर भीषण अपघात घडला. दाबोळी येथे राहणारी सहा वर्षीय गीता ही चिमुकली तिचा मामा विक्रम गोरी व आई तिके ओली यांच्यासहीत ‘डीवो’ दुचाकीवरून (क्र: जीए ०६ सी ५०८२) वरुणापूरी मार्गाने घरी जात होती. ह्या वेळी बायणा, वास्को भागातील २३ वर्षीय प्रेमचंद माली यांने चुकीच्या मार्गाने भरफाम वेगाने ‘व्हॅगनार’ चारचाकी (क्र - जीए ०८ एम ४३१४) आणून समोरासमोरून ‘डीवो’ दुचाकीला जबर धडक दिली. ‘व्हॅगनार’ एवढी भरफाम होती की दुचाकीला धडक दिल्यानंतर ती न स्थिरावता नंतर पुढे उभी करून ठेवलेल्या अन्य एका टॅक्सी चारचाकीला जाऊन धडकली. सदर अपघातात डीवो चालवणारा विक्रम, सहा वर्षीय गीता व गीताची आई तेकी रस्त्यावर फेकून त्यांना गंभीर रित्या जखमा झाल्या. गंभीर रित्या जखमी झालेल्या तिघांना नंतर त्वरित उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार इस्पितळात उपचार घेत असताना सहा वर्षीय गीता ह्या चिमुकलीचा बुधवारी सकाळी दुर्देवी अंत झाला. पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून २३ वर्षीय ‘व्हॅगनार’ चारचाकी चालक प्रेमचंद याला ताब्यात घेतला आहे. चुकीच्या मार्गाने भरफाम वेगाने गाडी आणून दुचाकीला धडक दिलेल्या वेळी व्हॅगनार चालक प्रेमचंद दारूच्या नशेत होता का, हे जाणून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असल्याची माहीती पोलीसांनी दिली.

अशा प्रकारे अपघातात सहा वर्षीय गीता ह्या मुलीचा दुर्देवी अंत झाल्याने तिच्या कुटुंबात तसेच शेजाऱ्यात याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर अपघातात जखमी असलेल्या गीता हीचा मामा विक्रम याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. गीताची आई तेकी हीच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचे पोलीसांनी माहितीत सांगितले. वास्को पोलीस सदर अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 6 years old girl dies in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.