दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 19:48 IST2020-10-29T19:47:04+5:302020-10-29T19:48:46+5:30
पोलिसांचा बंदोबस्त असूनही ससून रुग्णालयात गुंड बापू नायरला भेटले होते आरोपी..

दीपक मारटकर खून प्रकरणात 'खळबळजनक' माहिती समोर ; ६ पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे : शिवसेनेचे युवा नेते दीपक मारटकर खून प्रकरणात एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरुन हा खून झाल्याचे तपासात पुढे आले असून नायर हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपी त्याला भेटल्याचे आढळून आले आहे. त्यावरुन या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या ६ पोलिसांनी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातील १ पोलीस हवालदार व ५ पोलीस कर्मचाऱ्याचा त्यात समावेश आहे.
युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणी १० जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात हे आरोपी खून करण्यापूर्वी ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बापू नायर याला भेटले. त्या ठिकाणी खुनाचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बापू नायरच्या बंदोबस्तावर पोलीस मुख्यालयातील ६ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असे असतानाही हे आरोपी त्याला कसे भेटले़ हा प्रश्न उपस्थित झाला होता़ दीपक मारटकर खुन प्रकरणातील तपासी अंमलदारांनी त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला. त्यानंतर त्यावर चौकशी करण्यात आली. आरोपी बापू नायर याला भेटले. त्या कालावधीत बंदोबस्तावर असलेल्या ६ जणांना कर्तव्यात कुचराई केल्याने व पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याच्या कारणावरुन निलंबित करण्यात आले आहे.