चिंचवडमध्ये आढळली ४३ जिवंत काडतुसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 16:21 IST2018-11-23T16:00:59+5:302018-11-23T16:21:11+5:30
कचरावेचक महिला कचरा गोळा करत असताना एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत ४३ जिवंत काडतुसे सापडली.

चिंचवडमध्ये आढळली ४३ जिवंत काडतुसे
पिंपरी : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट जवळील पुलाखाली लोहमार्गालगत कचरावेचक महिलेला एका पिशवीत तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही काडतुसे येथे कोठून आली. याबाबतचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका ८५ वर्षीय कचरावेचक महिला एम्पायर इस्टेटजवळील पुलाखाली कचरा गोळा करत होती. त्यावेळी येथील लोहमार्गालगत एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत ४३ जिवंत काडतुसे सापडली. याबाबतची माहिती महिलेने पिंपरी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काडतुसे ताब्यात घेतली.
यातील २६ काडतुसांवर केएफ ९९ असे इंग्रजीमध्ये लिहिले आहे. तर सिल्व्हर रंगाच्या १० काडतुसांवर इंग्रजीमध्ये मेड इन बेल्जियम १२ असे लिहिले असून उर्वरित ७ काडतुसे लाल रंगाचे असून त्यावर इंग्रजीमध्ये वेस्टर्न सुपर १२ मेड इन युएसए असे लिहिलेले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.