40 lakh bribe under the pretext of college admission, case registered at APMC police station | महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने ४० लाखांचा गंडा, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने ४० लाखांचा गंडा, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

नवी मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ४० लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर फसवून घेतलेल्या रकमेचा डीडी हा सोलापूर येथील बँकेत वटवण्यात आला आहे.
ठाणे येथे राहणाऱ्या जावेद शेख यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून भावाच्या दोन मुलींना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यादरम्यान इंटरनेटवर त्यांना संबंधित व्यक्तीची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला असता, त्याने दोन्ही मुलींना कामोठे येथील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्याकरिता एका विद्यार्थ्यांची वर्षाची २० लाख रुपये याप्रमाणे दोन्ही मुलींचे ४० लाख रुपये मागितले होते. त्यानुसार शेख यांच्या भावाने एपीएमसीमधील सत्रा प्लाझा येथे त्या व्यक्तीची भेट घेतली होती. यावेळी त्याने सांगितल्याप्रमाणे २० लाखांचे दोन डीडी देण्यात आले. त्यानंतर दोन व्यक्ती त्यांना कामोठे येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेले होते. त्याठिकाणी फॉर्म भरल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर त्या व्यक्ती शेख यांना फोनवर प्रतिसाद देण्यास टाळू लागल्या. यामुळे त्यांनी महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी डीडीबाबत चौकशी केली असता, तो सोलापूर येथील एका बँकेत वटला असल्याचे समोर आले. त्यामुळे झालेल्या फसवणुकीबाबत त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली असून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 40 lakh bribe under the pretext of college admission, case registered at APMC police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.