३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 08:44 IST2025-12-24T08:42:21+5:302025-12-24T08:44:18+5:30
संशय माणसाचा कसा घात करतो, याचे हे भीषण उदाहरण आहे. ३० वर्षांचे नाते एका क्षणात संपले आणि एक हसते-खेळते कुटुंब उध्वस्त झाले.

AI Generated Image
बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका नराधम पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. ३० वर्षांचा सुखी संसार अवघ्या काही क्षणांच्या रागामुळे उध्वस्त झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर हा आरोपी पती स्वतःच्या भावाकडे गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
नेमकं प्रकरण काय?
मनियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरख गावात ही घटना घडली आहे. कपिलेश्वर प्रसाद असे आरोपी पतीचे नाव असून सुरजी देवी असे मृत महिलेचे नाव आहे. कपिलेश्वर हा गेल्या २५ वर्षांपासून लुधियाना येथील एका खाजगी कंपनीत मजुरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. मात्र, गावी आल्यापासून त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या वादाचे रूपांतर पहाटे ३ च्या सुमारास हिंसक वळणावर पोहोचले. रागाच्या भरात कपिलेश्वरने घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने झोपेत असलेल्या सुरजी देवीच्या मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर हा आरोपी दोन तास पत्नीच्या रक्ताळलेल्या मृतदेहाशेजारीच बसून होता.
भावासमोर दिली कबुली
सकाळ होताच आरोपी घराबाहेर पडला आणि त्याने आपल्या सख्ख्या भावाला गाठले. "कुणाला सांगू नको, पण मी तुझ्या वहिनीला संपवलं आहे," असे त्याने थंडपणे सांगितले. हे ऐकून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने घरात जाऊन पाहिले असता सुरजी देवी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर भावाने आरडाओरडा करून गावकऱ्यांना जमवले आणि पळून जाणाऱ्या कपिलेश्वरला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त
मृत सुरजी देवी आणि कपिलेश्वर यांना दोन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले असून मुलगा रुग्णवाहिकेत चालक म्हणून काम करतो. घटनेच्या वेळी मुलगा ड्युटीवर होता, त्यामुळे घरात पती-पत्नी दोघेच होते. ३० वर्षांच्या जुन्या नात्याचा असा रक्ताळलेला शेवट पाहून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच डीएसपी अनिमेश चंद्रा ज्ञानी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.