३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:54 IST2025-11-21T15:53:45+5:302025-11-21T15:54:28+5:30
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका प्रियकराने प्रेयसी शिक्षिकेला अतिशय क्रूर पद्धतीने संपवले.

३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण...
प्रेमातून झालेल्या विवादाचा एक अत्यंत क्रूर आणि भयानक शेवट बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये झाला आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका प्रियकराने शिक्षिकेवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, दोन गोळ्या झाडल्यानंतर ती जिवंत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहाजवळ जाऊन पायाला धक्का मारला आणि ती जिवंत असल्याचे दिसताच तिसरी गोळी झाडून तिचा जीव घेतला. या हत्याकांडानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी बिट्टू कुमारला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तीन वर्षांचे प्रेमसंबंध, लग्नास नकार देताच हत्या
मुजफ्फरपूर पोलिसांनी टीचर कोमल कुमारी हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिट्टू कुमार याला पोलिसांनी त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी बिट्टू कुमारने कबूल केले की, त्याचे आणि मृत कोमलचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत कोमलने त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. या प्रेमसंबंधावरून कोमलच्या कुटुंबात आणि गावात आधीही पंचायत झाली होती.
आत्महत्येची धमकी, तरीही कोमलचा नकार कायम
आरोपी बिट्टूने पोलिसांना सांगितले की, कोमलच्या वडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्याचे समजल्यावर त्याने तिला सोबत पळून जाण्याचा प्लॅन सुचवला. बिट्टूच्या म्हणण्यानुसार, त्याने कोमलला धमकी दिली होती की जर तिने लग्न करण्यास नकार दिला, तर तो आत्महत्या करेल. मात्र, कोमलने कुटुंबाच्या विरोधात न जाण्याचे सांगून बिट्टूच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला. या नकाराने संतापलेल्या बिट्टूने अनेक दिवस नशा केली. कोमलच्या नकाराने तो सतत अस्वस्थ होता आणि याच रागातून त्याने तिची हत्या करण्याची योजना आखली. त्याने मित्राकडून पिस्तूल मागवली आणि २१ नोव्हेंबर रोजी संधी साधून हा क्रूर गुन्हा केला.
लहान भावासमोर केला हल्ला
ही थरारक घटना मुशहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर पुलाजवळ घडली. कोमल आपल्या लहान भावासोबत कोचिंग क्लासमधून शिकवून घरी परतत होती.
कोमलचा भाऊ आदित्यने पोलिसांना सांगितले की, ते दोघे पुलाजवळ पोहोचताच तिथे आधीच उभ्या असलेल्या एका मास्क घातलेल्या बाईकस्वाराने त्यांना थांबवण्याचा इशारा केला. आदित्यने बाईक थांबवून त्याला थांबवण्याचे कारण विचारले, पण त्याने काहीही उत्तर दिले नाही. थोड्या वेळाने आदित्यने त्याला बाजूला व्हायला सांगितले असता, तो हटला नाही. यावर आदित्य संतापून लाकडी दांडा घेण्यासाठी जवळच्या झुडपांकडे गेला, त्याच वेळी गोळीबार झाल्याचा आवाज आला.
पाय हलवून पाहिले 'ती' जिवंत आहे का?
मागे वळून पाहिल्यावर आदित्यने पाहिले की, आरोपीने कोमलवर दुसरी गोळी झाडली होती आणि ती जमिनीवर कोसळली होती. आदित्यच्या म्हणण्यानुसार, खाली पडल्यानंतर आरोपीने कोमलला पायाने हलवून पाहिले. ती गंभीर जखमी झाली आहे, पण जिवंत आहे, याची खात्री झाल्यावर आरोपीने तिच्यावर तिसरी गोळी झाडली आणि नंतर बाईकवरून फरार झाला. लांब असल्यामुळे आदित्यला वेळीच हल्लेखोरापर्यंत पोहोचता आले नाही.
गोळीबाराची माहिती मिळताच कोमलचा चुलत भाऊ राहुल घटनास्थळी पोहोचला. पोलिसांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कोमल एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होती. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, आरोपीला तिच्या दिनचर्येची पूर्ण माहिती होती आणि त्यानुसार त्याने योजना करून हल्ला केला.
मुशहरी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. हत्येसाठी वापरलेले पिस्तूल आणि इतर पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.