झरे येथील जिल्हा बँकेचे २२ लॉकर तोडून दागिने लंपास; ९ लाख ३० हजारांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 23:50 IST2026-01-08T23:49:05+5:302026-01-08T23:50:04+5:30
बँकेची रोकड सुरक्षित, ग्राहकांशी संपर्क सुरू, झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा बँक शाखेतील लॉकर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले.

झरे येथील जिल्हा बँकेचे २२ लॉकर तोडून दागिने लंपास; ९ लाख ३० हजारांची चोरी
आटपाडी - झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील २२ लॉकर फोडून अज्ञात चोरट्यांनी ९ लाख ३० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून चोरी करण्यात आली. मात्र लॉकरशिवाय त्याठिकाणी असलेली बँकेची रोकड सुरक्षित राहिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ७ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता शाखाधिकारी हणमंत धोंडिबा गळवे व अन्य कर्मचारी बँक बंद करुन निघून गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजुच्या खिडकीच्या काचा फोडून, लोखंडी गज गॅस कटरने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर लॉकरमधील दागिने लंपास केले.
घटनास्थळी पाहणी केली असता काळ्या रंगाची गॅस सिलिंडरची टाकी, पाईप, कटर तसेच साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. लॉकर क्रमांक २, ३, ४, ९, ११, १२, १३, १४, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २७, २८, २९, ३०, ३१ व ३२ हे गॅस कटरने फोडण्यात आले आहेत. दि. ८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास बँकेजवळ आल्यानंतर शाखाधिकारी गळवे यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. तातडीने त्यांनी वरिष्ठ अधिकारी व आटपाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.
ही बँक शाखा झरे-खरसुंडी रस्त्यावर असलेल्या तुकाराम पडळकर यांच्या स्वतःच्या मालकीच्या दोन मजली इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर तुकाराम पडळकर हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळेत इतकी मोठी चोरी होऊनही कोणालाही संशय न येणे, यामुळे बँक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वायरी तोडून केला सुरक्षित प्रवेश
बँकेत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वायर, सायरनची वायर व इंटरनेट केबल तोडून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था निष्क्रिय केली. त्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर स्वतःबरोबर घेऊन गेले. यामुळे चोरीपूर्व तयारी व तांत्रिक माहिती चोरट्यांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.
चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वेगात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बँक सुरक्षेचा आढावा घेण्याची मागणी
बँकांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, ही घटना नागरी वस्तीत घडल्याने झरे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. झरे गावात या अगोदरही अन्य बँक फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
श्वानपथक, ठसे तज्ज्ञांकडून पाहणी
घटनास्थळी सांगली येथील डॉग स्कॉड पथक व ठसे तज्ज्ञांच्या पथकांनी पाहणी केली आहे. अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
मोठा ऐवज चोरीला
काही लॉकरधारक घटनास्थळी दाखल झाले. लॉकर क्रमांक ४ मधून दोन तोळ्याचा सोन्याचा हार, दीड तोळ्याची सोन्याची चैन व जमिनीचे कागदपत्र, लॉकर क्रमांक २७ मधून सुमारे ५०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व दागिने, तर लॉकर क्रमांक १९ मधून ११ तोळे सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी एका लॉकरमधून २५० ग्रॅम चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार एकूण ९ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित लॉकरधारकांकडून माहिती संकलनाचे काम सुरू आहे.