अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दोघांना २० वर्षांचा कारावास; दोन वर्षांत गुन्ह्याचा फैसला
By अझहर शेख | Updated: August 25, 2022 00:07 IST2022-08-25T00:03:00+5:302022-08-25T00:07:22+5:30
२४ जून २०२० रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यात एका गावात अवघ्या १४वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुरागाणा पोलिसांनी सखोल तपास करत मुलीचा शोध घेतला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दोघांना २० वर्षांचा कारावास; दोन वर्षांत गुन्ह्याचा फैसला
नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. जिल्हा न्यायाधीश डी.डी.देशमुख यांनी आरोपी हरीचंद्र नथु गायकवाड (२३), विलास पुंडलिक चौधरी (२२) यांना वीस वर्षांचा कारावास व १३ हजारांचा दंड, अशी शिक्षा बुधवारी (दि.२४) सुनावली.
२४ जून २०२० रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यात एका गावात अवघ्या १४वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुरागाणा पोलिसांनी सखोल तपास करत मुलीचा शोध घेतला होता. गायकवाड व चौधरी या दोघांनी तिचे अपहरण करून तिला जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील गावांमध्ये फिरवून ४ जुलैपर्यंत वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पिडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघा संशयितांविरुद्ध बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल केला.
चौधरी याने त्याच्या दुचाकीचा (एम.एच०४ डीएच०१०३) अपहरणासाठी गुन्ह्यात वापर केला होता. या दोघांना पोलिसांनी ६ जुलै २०२० साली अटक केली गेली होती. न्यायालयाने त्यावेळी त्यांना आठवडाभराची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अंतीम सुनावणीत सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भीडे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी यावेळी सात साक्षीदार तपासले. त्यात परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्ष यांच्या अधारे दोघांविरोधात गुन्हा सिद्धा झाला.