प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:58 IST2025-11-06T09:58:14+5:302025-11-06T09:58:50+5:30
संबंधित प्रकरणात चौघांना अटक तर दोघे फरार

प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: विरारच्या मनवेलपाडा येथे २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी विरार पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ४ जणांना अटक केली असून, ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलीची रवानगी भिवंडीतील बालगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनवेल पाडा येथील शिव शंभो अपार्टमेंटमध्ये ऋचा पाटील ही आईवडिलांसोबत राहत होती. ती विरार येथील विवा कॉलेजमध्ये बी.कॉम.मध्ये शिकत होती. त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अमित दिनेश प्रजापती नावाच्या विद्यार्थ्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. ते प्रेमसंबंध तुटले. अमित तिला ब्लॅकमेल करीत होता. घटनेच्या दोन दिवसआधी कॉलेजमध्ये दोघांमध्ये वाद झाला. अमितने तिच्या कानशिलात लगावली. ती कॉलेजमधून बाहेर पडताना, अमितचा मित्र शिवा प्रल्हाद मदेसिया याने तिला अडवले. अमितने कानाखाली मारल्याने ऋचाने वडिलांना सांगितले. १३ ऑक्टोबर रोजी ऋचा तिच्या वडिलांना घेऊन प्राचार्यांकडे तक्रार करण्यासाठी कॉलेजात गेली होती; पण प्राचार्य उपस्थित नव्हते. त्यावेळी ऋचाचा प्रियकर अमित प्रजापती, शिवा, राकेश पाल, कृष्णा गुप्ता, एक अल्पवयीन मुलगी व इतर दोन तरुण कॉलेजमध्ये पोहोचले.
वडिलांचा अपमान जिव्हारी
ऋचाच्या वडिलांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते ऋचाबद्दल उलटसुलट बोलू लागले. संतापून ऋचाच्या वडिलांनी अमितला कानशिलात लगावली. त्यानंतर तिथे गोंधळ झाला. सर्व जण ऋचा आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ करू लागले. त्यांनी विरोध केल्यावर त्या आरोपींनी ऋचाच्या वडिलांना मारहाण केली. या घटनेमुळे ऋचा दुःखी झाली. ती वडिलांना घेऊन घरी आली. सर्वांसमोर झालेला हा अपमान तिला सहन झाला नाही. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली.