एटीएम कार्डची अदलाबदली करुन फसवणूक करणाऱ्या २ सराईत आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 21:14 IST2024-10-02T21:14:03+5:302024-10-02T21:14:19+5:30
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदारांना गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश दिला.

एटीएम कार्डची अदलाबदली करुन फसवणूक करणाऱ्या २ सराईत आरोपींना अटक
- मंगेश कराळे
नालासोपारा : हातचलाखी करुन एटीएमची अदलाबदली करुन त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या २ सराईत आरोपींना अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी श्रीराम करांडे यांनी बुधवारी दिली आहे.
वाकणपाड्याच्या सिताराम बिल्डिंगमध्ये राहणारा रमाकांत मोहत्तीं (२२) हा २१ सप्टेंबरला रात्री धानिवबाग येथील इन्ड्सइंड बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी तेथे असलेल्या एका आरोपीने त्याच्या एटीएम कार्डची अदलाबदली करून त्याच्या बँक खात्यातून ५५ हजार ४५० रुपयांची रक्कम काढून त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदारांना गुन्हा उघडकीस आणण्याचा आदेश दिला.
या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून एटीएम व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी एका वॅगनार कारमधून गुन्हा करण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने त्या कारचा घटनास्थळ ते कळंबोली असा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाठलाग केला. ती कार आरोपींनी झुम ऍपवरून बुक केल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे महेश धनगर (२७) आणि जितेश जाटप उर्फ डब्बू (२९) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केल्यावर त्यांनी व त्यांचे दोन साथीदार या चौघांनी मिळून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी अशाच प्रकारचे मुंबई सीएसटी, भिवंडी बायपास, मानखुर्द, भिवंडी काल्हेर रोड येथे गुन्हे केल्याचे सांगितले आहे. दोघेही आरोपी सराईत असून महेशवर ९ तर जितेशवर ३ गुन्हे दाखल आहेत.