Elvish Yadav Firing Case: हरियाणाच्या गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणात, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मोठी कारवाई करत आणखी दोन शूटर्सना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे गौरव आणि आदित्य अशी आहेत. दोघेही नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. हे आरोपी गँगस्टर हिमांशू भाऊसाठी काम करत होते आणि अमेरिकेत असताना सिग्नल अॅपद्वारे त्याच्या संपर्कात होते. यापूर्वी आणखी एका आरोपीला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये पकडलं होतं.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गँगस्टर नीरज फरीदपुरिया-हिमांशू भाऊ टोळीच्या दोन शार्प शूटरना अटक केली. या दोघांनीही १७ ऑगस्ट रोजी गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी गोळीबार केला होता. सकाळी ५:२५ च्या सुमारास तिघेही आरोपी दुचाकीवरून आले. दोघांनी एल्विश यादवच्या घरी अंदाधुंद गोळीबार केला आणि तिसरा दुचाकीवर बसून राहिला. त्यानंतर गँगस्टर नीरज फरीदपुरियाने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी घेतली. याप्रकरणी गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गौरव आणि आदित्य हे दोन्ही आरोपी पुन्हा दिल्लीत मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधी त्यांनी नेपाळ सीमेवर पळून जाण्याची योजना आखली होती. मात्र त्यांच्या बॉसने त्यांना परत येण्यास सांगितले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी रोहिणी येथील शाहबाद डेअरीजवळील खेरा कालव्यावर सापळा रचला. गौरव आणि आदित्य पोहोचताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात त्यांच्यापैकी एकाने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता या टोळीशी संबंधित इतर लोकांचा आणि त्यांना पैसे पुरवणाऱ्यांचा शोध घेत आहेत. एल्विश यादवच्या घरी गोळीबार करण्यासाठी गौरव आणि आदित्य यांना प्रत्येकी ५०,००० रुपये मिळाले होते. त्याआधी गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहाटे फरीदपूर गावाजवळ झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी एन्काऊंटरनंतर इशांत गांधी उर्फ इशूला अटक केली होती.