लातुरात कोयत्याचा धाक दाखवून १९ वर्षीय तरुणाला लुटले! गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:20 IST2026-03-03T16:19:07+5:302026-03-03T16:20:10+5:30
आरोपींनी उपस्थित नागरिकांनाही कोयता दाखवून धमकावले आणि परिसरात दहशत माजवून तिथून पळ काढला.

लातुरात कोयत्याचा धाक दाखवून १९ वर्षीय तरुणाला लुटले! गुन्हा दाखल
लातूर : शहरातील जुना औसा रोड परिसरात एका १९ वर्षीय तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत आठ हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रहर्ष महेश चव्हाण (वय १९, रा. गणेश नगर, लातूर) हा १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. जुना औसा रोडवरील नेटीझन क्लासेसजवळ आरोपी रवी कसबे, साईराज उर्फ साया वाघमारे, हनी उर्फ ओम पाटील आणि अनिकेत उर्फ गोविंद राऊत यांनी त्याला गाठले.
मुख्य आरोपी रवी कसबे याने 'तुला पैशाचा माज आला आहे का?' असे म्हणत कमरेचा कोयता काढून प्रहर्षच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रहर्षने प्रसंगावधान राखून वार चुकवला. त्यानंतर इतर तीन आरोपींनी त्याला घट्ट पकडून ठेवले. रवीने कोयत्याचा धाक दाखवून प्रहर्षच्या खिशातील आठ हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले.
याबाबत प्रहर्ष चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३११, ३५२ सह शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि. सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. पाटील हे करत आहेत.
दहशत माजवून आरोपी झाले पसार... -
मारहाणीदरम्यान आरोपी साईराजने काठीने, तर हनीने कमरेच्या बेल्टने प्रहर्षला बेदम मारहाण केली. अनिकेतने लाथाबुक्क्यांनी मारून त्याला जखमी केले. आरोपींनी उपस्थित नागरिकांनाही कोयता दाखवून धमकावले आणि परिसरात दहशत माजवून तिथून पळ काढला.