आधी २६ वर्षीय शिक्षिकेची काढली छेड; तक्रार करताच विद्यार्थी पेट्रोल घेऊन घरात घुसला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:51 IST2025-08-20T15:51:40+5:302025-08-20T15:51:59+5:30
मध्य प्रदेशात एका विद्यार्थ्याने रागातून एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

आधी २६ वर्षीय शिक्षिकेची काढली छेड; तक्रार करताच विद्यार्थी पेट्रोल घेऊन घरात घुसला अन्...
MP Crime:मध्य प्रदेशातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात शाळेतील माजी विद्यार्थ्याने शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पूर्व वैमनस्यातून विद्यार्थ्याने हे धक्कादायक कृत्य केले. शिक्षिकेने आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार केली होती, ज्याचा बदला घेण्यासाठी शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.
सोमवारी घडलेल्या या घटनेत, २६ वर्षीय शिक्षिका २५ टक्के भाजली होता आणि तिला चांगल्या उपचारांसाठी जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी सूर्यांश कोचर, हा एक वर्षापूर्वीच दहावी उत्तीर्ण झाला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एकतर्फी प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे आणि त्या आधारावर तपास केला जात आहे. शिक्षिकेच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना दुपारी ३:३० च्या सुमारास घडली जेव्हा आरोपी पेट्रोलने भरलेली बाटली घेऊन शिक्षिकेच्या घरी पोहोचला. त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला आग लावली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी शिक्षिकेचे शरीर २५ टक्के जळाल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षिकेला जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. आता शिक्षिका धोक्याबाहेर आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात शिक्षिकेने पारंपारिक साडी नेसली होती. आरोपी विद्यार्थ्याने यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार केली. याबद्दल तो संतप्त झाला. सोमवारी तो बाटलीत पेट्रोल घेऊन शिक्षिकेच्या घरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याने तिच्यावर पेट्रोल शिंपडले आणि तिला आग लावली. आरोपी आणि शिक्षिका गेल्या २ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आरोपी सूर्यांश कोचर याचे शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम होते. शाळेतून काढून टाकल्यानंतर तो दुसऱ्या शाळेत शिकत होता.