जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याने १७ आरोपींवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:42 IST2019-11-15T13:41:25+5:302019-11-15T13:42:40+5:30
घरातील सर्व सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून बाहेर काढले...

जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याने १७ आरोपींवर गुन्हा
पिंपरी : घरातील सर्व सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्याकडील मोबाइल काढून घेतले. तसेच घरगुती साहित्य घराबाहेर टाकून नुकसान केले व घराचा ताबा घेतला. चिखली प्राधिकरण येथे गुुरुवारी (दि. १४) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुमारे १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरती संजय चौगुले (वय ४३, रा. चिखली प्राधिकरण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव येडगे, संतोष येडगे व इतर १० ते १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी महादेव येडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी आरती चौगुले यांच्या घरी आरोपी आले. त्यांनी चौगुले यांच्या घरातील सर्व सदस्यांचे मोबाइल काढून घेतले. त्यानंतर धक्काबुक्की करून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जबरदस्तीने घरगुती साहित्य घराबाहेर काढून टाकून नुकसान केले. त्यानंतर घराचा ताबा घेतला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.