'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:40 IST2025-09-03T15:37:16+5:302025-09-03T15:40:32+5:30

अमित शाह म्हणाले, जोवर सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, पकडले जात नाहीत अथवा त्यांचा खात्मा होत नाही, तोवर मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही...

Modi government resolves to make country Naxal-free till 31 March 2026 says Amit Shah | 'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित 

'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित 

रायपूर - केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे करेगुट्टालू डोंगरांवरील 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीस, डीआरजी आणि कोब्रा जवानांची भेट घेतली आणि त्यांना सन्मानित केले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा देखील उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी, करेगुट्टालू टेकड्यांवरील सर्वात मोठी नक्षलविरोधी मोहीम 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' यशस्वी केल्याबद्दल सर्व सुरक्षा दलांच्या जवानांचे अभिनंदन केले. तसेच, 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' दरम्यान जवानांनी दाखवलेले शौर्य आणि पराक्रम नक्षलविरोधी मोहिमेच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय म्हणून नोंदवला जाईल, असेही शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले, जोवर सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, पकडले जात नाहीत अथवा त्यांचा खात्मा होत नाही, तोवर मोदी सरकार स्वस्थ बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही भारत नक्षलमुक्त करूनच राहू.

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, उन्ह आणि प्रत्येक पावलावर आयईडीचा धोका असतानाही, सुरक्षा दलांनी मोठ्या शौर्याने  ही कारवाई यशस्वी केली आणि नक्षलवाद्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केला. करेगुट्टालू टेकडीवरील नक्षलवाद्यांचे साहित्य आणि पुरवठा साखळीही छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफ, डीआरजी आणि कोब्राच्या सैनिकांनी उद्धवस्त केली. नक्षलवाद्यांनी देशातील कमी विकास झालेल्या भागांचे मोठे नुकसान केले. त्यांनी शाळा आणि रुग्णालयेही बंद केली. सरकारी योजना स्थानिकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. नक्षलविरोधी कारवायांमध्ये शारीरिक नुकसान झालेल्या सुरक्षा दलांच्या जवानांचे जीवन सुरळीत चालावे यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर, मोदी सरकार ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षल मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही शाह यावेळी म्हणाले.
 

Web Title: Modi government resolves to make country Naxal-free till 31 March 2026 says Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.