औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:19 IST2018-09-10T17:18:41+5:302018-09-10T17:19:45+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पदमपुरा येथे उघडकीस आली.
निकेतन शिवदास आदमाने (२५,ह. मु. पदमपुरा,मूळ रा. डकसळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद)असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, निकेतन हा केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी दोन वर्षापासून औरंगाबादेतील पदमपुरा येथे घर भाड्याने घेऊन राहात होता. रविवारी रात्री तो जेवण करून झोपला. आज सोमवारी सकाळी तो खोलीबाहेर आलाच नाही. यामुळे त्याचे मित्र त्याच्या खोलीवर गेले त्यावेळी निकेतनची खोली आतून बंद होती. आवाज देऊनही त्याने दार न उघडल्याने शेवटी पोलिसांच्या मदतीने दार उघडण्यात आले. त्यावेळी निकेतनने पत्र्याच्या लाकडी आड्याला दोरीने बांधून गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी निकेतनला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निकेतनच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.