जुन्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून, एक संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 15:47 IST2023-04-28T15:46:56+5:302023-04-28T15:47:18+5:30
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले आहे

जुन्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून, एक संशयित ताब्यात
वैजापूर: तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीपात्राजवळ आज सकाळी एका तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा पोपट हरिश्चंद्रे (वय २६, रा. लासुरगाव) असे मृताचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक मनोज पाटील, हेड कॉन्स्टेबल किरण गोरे, पोलिस अंमलदार प्रशांत गिते, गणेश कुलट, गणेश पैठणकर, गोपाल जाणवाल, दिनेश गायकवाड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
लासुरगाव येथील नदीपात्रात कडेला यात्रेतील पाळण्याजवळ कृष्णा हरिश्चंद्रे याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले असून अन्य एकाचा शोध सुरु आहे. दरम्यान, हा खून जुन्या वादातून झाल्याची चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहेत.