मित्राच्या वरातीत नाचताना रस्त्याशेजारील विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:27 IST2021-02-22T19:24:27+5:302021-02-22T19:27:22+5:30

लग्नाची वरात निघाल्यानंतर नवरदेवासमोर डीजेच्या तालावर सर्व जण थिरकत होते.

A young man dies after falling into a roadside well while dancing at a friend's wedding | मित्राच्या वरातीत नाचताना रस्त्याशेजारील विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

मित्राच्या वरातीत नाचताना रस्त्याशेजारील विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देवरातीच्या मार्गावर विनाकठड्याची विहीर आहे.अंधारात तरुणाला विहीर दिसली नाही आणि तो त्यात कोसळला

औरंगाबाद : कच्ची घाटी (ता. औरंगाबाद) येथे मित्राच्या लग्नाच्या वरातीत नाचत असताना रस्त्याशेजारील विनाकठड्याच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता घडली. याविषयी चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सचिन गोरखनाथ आरते (२४, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मयताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार सचिन यांच्या मित्राचा लग्नसमारंभ कच्ची घाटी येथे रविवारी रात्री आयोजित केला होता. लग्नाची वरात निघाल्यानंतर नवरदेवासमोर डीजेच्या तालावर सर्व जण थिरकत होते. वरातीच्या मार्गावर विनाकठड्याची विहीर आहे. अंधारात सचिन यांना ही विहीर दिसली नाही आणि ते पाय घसरून पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले.

यानंतर गावातील तरुण आणि मित्रांनी त्याला तत्काळ विहिरीतून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. सचिन नारायण औटे आणि अन्य एकाने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून रात्री पावणेअकरा वाजता मयत घोषित केले. पोलीस हवालदार रवी साळवे आणि अजित हेकडे हे या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: A young man dies after falling into a roadside well while dancing at a friend's wedding