तरुणी गर्भवती राहताच जात आठवली, लग्नास नकार देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:40 IST2025-10-14T13:39:42+5:302025-10-14T13:40:25+5:30
"मी आत्महत्या करतो!" लग्न करू म्हणताच गर्भवती प्रेयसीला धमकी; मुलीला जन्म दिल्यानंतर तरुणीची पोलिसांत धाव

तरुणी गर्भवती राहताच जात आठवली, लग्नास नकार देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : प्रेयसी अनुसूचित जातीची असल्याचे सांगत गर्भवती प्रेयसीला लग्नास नकार देऊन प्रियकराने तिलाच आत्महत्येची धमकी दिली. पीडितेने मुलीला जन्म देऊन आता पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून सागर दिलीप बेलकर (२५, रा. पडेगाव) याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२० वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, साधारण २ वर्षांपूर्वी तिची सागरसोबत ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. सागरने तरुणीला लग्नाचे स्वप्न दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जानेवारी २०२५ मध्ये तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर सागरने लग्नाचे आश्वासन दिले होते. काही दिवसांपूर्वी तरुणी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तिने ही बाब सागरला सांगितली. मात्र, सागरने त्या दिवसापासून तिच्यासोबत संपर्क कमी केला.
तरुणीने सातत्याने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने मी माझ्या कुटुंबाला या प्रकरणाबाबत काहीच सांगू शकत नाही. मी आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. यामुळे तरुणी तणावाखाली गेली होती. रविवारी तिची प्रकृती खराब झाल्यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले. सकाळी तिने मुलीला जन्म दिला. तरीही सागरने तिला संपर्क केला नाही. तरुणीने याबाबत छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून त्यांनी तत्काळ सागरवर गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.