तू नेहमीच शिवीगाळ करतो, आता तुला कायमचाच संपवतो; मामा-भाच्याकडून शेजाऱ्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:13 IST2025-04-01T16:12:04+5:302025-04-01T16:13:12+5:30
जवळपास १५ मिनिटे दोघांनी त्यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

तू नेहमीच शिवीगाळ करतो, आता तुला कायमचाच संपवतो; मामा-भाच्याकडून शेजाऱ्याचा खून
छत्रपती संभाजीनगर : सतत शिवीगाळ केल्याच्या रागातून मामा-भाच्याने मिळून परिसरातच राहणाऱ्या मनोज रंगनाथ नाडे (४२, रा.हर्षनगर) यांचा खून केला. जवळपास १५ मिनिटे दोघांनी त्यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे नाडे जागीच गतप्राण झाले. सोमवारी सकाळी ९:३० वाजता ही घटना घडली.
किशोर संतोष भालेराव (२४) व लड्ड्या उर्फ विजय सर्जेराव कुलकर्णी (२७, दोघेही रा.हर्षनगर) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. ३१ मार्च रोजी सकाळी मनोज घरासमोर बसलेले होते. यावेळी आरोपी किशोर तेथून जात होता. मनोज त्याला शिवीगाळ करतोय, असे त्याला वाटल्याने वाद उफाळून आला. किशोरने त्यांना रस्त्यावर ओढले. कुटुंबाने धाव घेतल्याने किशोर निघून गेला. काही वेळातच तो पुन्हा मामा विजयसोबत तेथे गेला. ‘तू नेहमीच शिवीगाळ करतो, आता तुला कायमचाच संपवतो,’ असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. स्थानिकांनी धाव घेत दोघांना बाजूला केले. बेशुद्ध पडलेल्या मनोज यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.
१५ मिनिटे सलग मारहाण
किशोर आणि विजयने मनोज यांच्या छाती, डोक्यावर जवळपास १५ मिनिटे लाथा-बुक्क्यांनी हल्ला चढवला. त्यामुळे मनोज यांचा घाटीत जाईपर्यंत मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच, सिटी चौकच्या वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक निवृत्ती गायके यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. चंदन, गायके यांच्यासह अंमलदार राजेंद्र साळुंके, प्रवीण टेकले, आनंद वाहूळ, बबन इप्पर, मनोहर त्रिभुवन यांनी त्यांचा शोध घेतला. दर्गा चौकातील एका नातेवाइकाच्या घरात लपलेल्या दोघांना पोलिसांनी उचलले.
आराेपी मजूर
मृत्युमुखी पडलेले मनोज आई, भावासोबत राहत होते. कौटुंबिक वादातून पत्नी दोन मुली आणि मुलासह काही वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली होती. ते रंगकाम करत. मारेकरी भालेराव कपड्याच्या दुकानात कामाला असून, कुलकर्णी सुरक्षारक्षक आहे.