Sanjay Shirsat: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनाबद्दल बोलताना शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः च्या अपघाताचा प्रसंग सांगितला. "अजित पवार अचानक गेले, कुणाला वाटलं तरी होतं का? काल माझीही वेळ आली होती. तुम्ही मला आज श्रद्धांजली वाहत असता, पण थोडक्यात वाचलो", असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी त्यांच्या कारचा अपघात झाला होता, असे सांगितले.
'दोन टायर फुटले, पण थोडक्यात वाचलो'
शिरसाट म्हणाले, "कालची घटना सांगतो. माणसाचा काही भरवसा नाही. अजितदादा गेले. कुणाला वाटले होते का असे काही होईल? काल माझी बारी आली होती. थोडक्यात वाचलो. येताना माझी गाडी एका खड्ड्यात आदळली आणि कारचे दोन्ही डावे टायर फुटले. मर्सिडीज गाडी होती. दुसरी गाडी इनोव्हा होती. ती अजून घरी आली नाही. काय भरवसा नाही माणसाच्या आयुष्याचा. काल काही बरं वाईट झालं असतं, तुम्ही मला आज श्रद्धांजली वाहिली असती. पण, पुण्य केल्याच्या जोरावर आज मी जिवंत आहे", असे सांगताच ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आला.
'उद्याची चिंता करू नका'
संजय शिरसाट म्हणाले, "उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. मी सर्वांना सांगतो. तुम्हाला मिळालेला आजचा दिवस चांगला घालवा. उद्याचा दिवस निघो अथवा न निघो. उमेदवारांनो टेन्शन घेऊ नका. मी जेवढा नम्र वागतो, तेवढेच तुम्हीही लोकांशी नम्र वागा. अविर्भावत जाऊ नका", असा सल्ला शिरसाट यांनी उमेदवारांना दिला.
"तुमच्या मतदारसंघात काहीच कमी पडणार नाही. काही कमी पडले तर मी मंत्री आहे ना. राज्यात सर्वाधिक बजेटवाला मंत्री मी आहे. साडेबावीस हजार कोटी रुपयांचे बजेट माझ्या एकट्याचे आहे. साडेबावीस हजार कोटीला किती शून्य लावायचे त्याला विचारून घ्या. हा पैसा आहे आपल्याकडे म्हणून मला लोक बजाज नगरचा आमदार म्हणतात. मी आमदार कुठला आहे, बजाज नगरचा", असेही शिरसाट म्हणाले.
अरे फोनपे ही काय भानगड आहे?
याच सभेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "दुसरा उमेदवार फोनपे करतोय. अरे ही फोनपे काय भानगड आहे? म्हणे मतदारांना विकत घेऊ. त्यांना फोनपेवर पैसे टाकू. अरे चांगले धंदे कर. कशाला नादाला लागतो? लोकांना मूर्ख बनवणे एवढे सोपे आहे का? ही सत्ता लोकांसाठी असते. मी किती मोठा झालो याला महत्त्व नाही. मी लोकांसाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे. ते काम केले पाहिजे."
"गेल्या २० वर्षांपासून मी आमदार आहे. कधी तरी तुम्हाला वाटलं का हा आमदार आहे. मंत्री आहे म्हणून. आपल्या घरातील वाटतो ना? माझे कुटुंब तुमच्यासोबत काम करते. मी पालकमंत्र्याची बायको आहे. मी पालकमंत्र्याची मुलगी आहे, असे कधी कुटुंबातील लोकांनी दाखवले आहे का?", असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.
Web Summary : Minister Sanjay Shirsat shared a near-death experience, recalling a car accident where he narrowly escaped. Two tires burst on his car, but he survived. He stressed living in the present and serving the people humbly.
Web Summary : मंत्री संजय शिरसाट ने एक बड़ा हादसा बताया, जिसमें वे बाल-बाल बचे। कार दुर्घटना में उनकी गाड़ी के दो टायर फट गए थे, लेकिन वे सुरक्षित रहे। उन्होंने वर्तमान में जीने और विनम्रता से लोगों की सेवा करने पर जोर दिया।