होय, मीच मारले! पाच हजारांत विकत घेतलेल्या चिमुकलीच्या निर्घृण हत्येची महिलेकडून कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:24 IST2025-03-28T19:22:23+5:302025-03-28T19:24:48+5:30
सिल्लोड शहरात ४ वर्षाय मुलीची हत्या करणाऱ्या पतीपत्नीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

होय, मीच मारले! पाच हजारांत विकत घेतलेल्या चिमुकलीच्या निर्घृण हत्येची महिलेकडून कबुली
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : आयत फईम शेख या ४ वर्षाय चिमुकलीची तिला विकत घेणाऱ्या दाम्पत्याने अंगावर चटके देऊन, बेदम मारहाण करत हात-पाय मोडून निघृण हत्या केल्याचे गुरुवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आज या प्रकरणातील आरोपी पतीपत्नी शेख फहिम शेख अय्युब ( ३५) आणि फौजिया शेख फहिम ( २७, रा.अजिंठा हल्ली मुक्काम मोगलपुरा सिल्लोड) यांना सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.टी. आढायके यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शहरातील मुगलपुरा भागात राहणाऱ्या शेख फहिम शेख अय्युब आणि फौजिया शेख फहिम यांनी पाच हजार रुपयात जालन्याच्या शेख नसीम अब्दुल कायुम कडून चार वर्षीय आयतला विकत घेतले होते. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चिमुकलीची हत्या केली होती. त्यानंतर लागलीच तिचा दफनविधी करत असताना नागरिकांच्या सतर्कतेने त्यांचा भांडाफोड झाला. माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. तर शवविच्छेदनानंतर चिमुकलीच्या खऱ्या आईच्या समक्ष दफनविधी करण्यात आला.
दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजता पोलिसांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात आरोपींना न्यायालयात हजर केले. पोलीस ठाणे ते सिल्लोड न्यायालयासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपींना आमच्या ताब्यात द्या. त्यांना आम्ही शिक्षा देतो, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली. न्यायालयाने निर्दयी पती-पत्नी शेख फहिम शेख अय्युब आणि फौजिया शेख फहिम यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक मयंक माधव , फौजदार बी. एस.मुंढे यांनी दिली.
होय मीच मारले...
आरोपी आई फौजिया शेख फहिम हिने होय मीच तिला मारहाण केली अशी कबुली पोलिसांना दिली. पण तिचा जीव जाईल असे आम्हाला वाटले नव्हते, असे सांगितले. इतक्या निर्दयीपणे हत्या का केली याबाबत तिने मौन बाळगले. दुसरीकडे आरोपी वडील शेख फहिम शेख अय्युब याने आम्ही तिला मारलेच नाही, असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
अत्याचार केल्याची शंका
आरोपींनी मुलीचा छळ केला. तिला उपाशी ठेवले. अंगावर चटके दिले, बेदम मारहाण करत हातपाय मोडले. तसेच चिमुकलीच्या गुप्तांगावर सूज आहे. यामुळे तिच्यावर अत्याचार झाल्याची शंका पोलिसांना आहे.
वकील पत्र घेतले नाही
दोन्ही आरोपींचे सिल्लोड न्यायालयातील एकाही वकिलाने वकील पत्र घेतले नाही. त्यांनी आधीच तसा ठराव घेतला होता. मात्र एनवेळी न्याय दंडाधिकारी यांनी आरोपीची बाजू मांडण्यासाठी एका वकिलाला आदेश देऊन उभे केले.
हा नरबळीचा प्रकार असू शकतो
ज्याप्रमाणे मुलीची निर्घृण हत्या झाली. त्यावरून हा प्रकार गुप्तधन मिळवण्यासाठी दिलेला नरबळीचा असू शकतो. याशिवाय मुलांना खरेदी विक्री करणारे एक रॅकेट जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सक्रिय आहे. याबाबत शोध घेण्याची मागणी पोलिसांना केली आहे.
- अॅड. शेख उस्मान सिल्लोड.
पाच हजारांत विकत घेतले
जालना येथील नाजीयाचे पाहिले लग्न जालना येथील शेख नसीम अब्दुल कायुम ( ३५) याच्या सोबत १५ वर्षांपूर्वी झाले होते. या दाम्पत्याला पाच मुली होत्या. मात्र, तिला पती शेख नसीम नीट वागवत नव्हता. यातून नाजीया व शेख नसीम यांचा जून २०२४ मध्ये घटस्फोट झाला. चार मुली नाजीयाकडे आहेत तर एक मुलगी ४ वर्षीय आयात ही वडील शेख नसीमकडे होती. नसीम हा दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि मुलगी आयातला भीक मागायला लावत होता. सहा महिन्यांपूर्वी एका मध्यस्थी मार्फत शेख नसीम व आरोपी शेख फईम यांची जालना येथेभेट झाली. यावेळी आयातला शेख नसिमने ५ हजारात शेख फईमला विकले. दोघांनी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर आयातला दत्तक देत असल्याचा करार केला. तेव्हापासून आयात ही आरोपी फौजिया व शेख फईम सोबत राहत होती.