लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सकल धनगर समाज क्रांती मोर्चातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोर्चातर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.पैठण तालुक्यातील परमेश्वर घोंगडे यांना शहिदाचा दर्जा देऊन २५ लाख रुपये आर्थिक मदत करावी. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात समाजाने म्हटले आहे, राज्यात लागू असलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीची छाननी केली असता अनु क्र. ३६ वर ओरॉन, धनगर जमातीची नावे नमूद केलेली आहेत. त्यानुसार छोटा नागपूर भागातील ओरॉन जमातीस भारतात धनगर नावाने ओळखले जाते. धनगड जमातीस धनगर असेही म्हणतात. हिंदी भाषिक प्रदेशात ‘र’ या शब्दाचा उच्चार ‘ड’ म्हणून केला जातो. हा शाब्दिक अपभ्रंश असल्याचे स्पष्ट आहे. १९६१ च्या जनगणनेच्या अनु.जाती, अनु.जमातीविषयी गृहखात्याने प्रसिद्ध केलेल्या सूची पुस्तिकेत धनगर, धनगड हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात अनु.जमातीत मोडतात. धनगर ही जमात अनुसूचित जमातीत मोडते. धनगड व धनगर ही एकच जमात आहे. मनजित कोळेकर, डॉ.संदीप घुगरे, सुरेश डोळझाके, दीपक महानवर, श्याम गुंजाळ, दिलीप रिठे, संजय कटाकडे, कैलास गायके, धोंडीराज ढेपले आदी आंदोलनात सहभागी होते.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचा येळकोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:46 IST