जिल्हाभरात संताप
By Admin | Updated: February 22, 2015 00:37 IST2015-02-22T00:31:37+5:302015-02-22T00:37:24+5:30
उस्मानाबाद/उमरगा : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा शनिवारी जिल्हाभरातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला

जिल्हाभरात संताप
उस्मानाबाद/उमरगा : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा शनिवारी जिल्हाभरातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यातील आरोपींना तातडीने जेरबंद करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सर्वपक्षीयांसह संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यानुसार रविवारी उस्मानाबाद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पानसरे यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरा धडकताच पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हत्याकांडाचा निषेध नोंदविला. उमरगा येथे सकाळी दहाच्या सुमारास अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्रित येवून आदरांजली वाहिली. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सगर यांच्यासह सुभाष वैरागकर, अमोल पाटील, कॉ. किसन कटके, कॉ. इंद्रजीत कांबळे, बशीर शेख, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर वैराळे, अभिषेक औरादे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अंबादास जाधव, तालुकाध्यक्ष प्रदीप भोसले, बहुजन संघर्ष समितीचे कमलाकर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, धीरज कांबळे यांच्यासह सिध्देश्वर कांबळे, अॅड. हिराजी पांढरे, अॅड. मल्हारी बनसोडे, मुरूमचे माजी नगराध्यक्ष जगन्नाथ लिमये, परिट संघटनेचे एम. के. जगताप, शेतकरी विकास सेनेचे शाहुराज माने, लहुजी शक्ती सेनेचे संजय क्षीरसागर, आंबेडकर स्टुडंट फेडरेशनचे दिलीप गायकवाड, होळीचे सरपंच दत्ता गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. पानसरे यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत अतिरेकी प्रवृत्तीच्या धर्मांध शक्तीने केलेला हा भ्याड हल्ला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.