अबब! चार लाख रुपयांत पडणार होता ३ कोटींचा पाऊस; उद्योजकासह दोन भोंदूबाबांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:58 IST2025-06-14T19:57:59+5:302025-06-14T19:58:41+5:30
जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचा अघोरी प्रकार

अबब! चार लाख रुपयांत पडणार होता ३ कोटींचा पाऊस; उद्योजकासह दोन भोंदूबाबांना अटक
छत्रपती संभाजीनगर : चार लाख रुपयांत तीन कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी हॉटेलच्या खोलीत बैठक बसली. गंडेदोरे, हारतुरे, ओले, सुके नारळ, कवड्या, जडीबुटी मांडली गेली. पैशांच्या पावसासाठी जय्यत तयारी झाली. जादूटोणा सुरू होताच गुन्हे शाखा खोलीत धडकली. पैशांच्या पावसासाठी सुरू असलेला खटाटोप उघड झाला. पथकाने यात तिघांना अटक करत कोट्यवधी रुपयांचे धनादेशही जप्त केले. गुरुवारी रात्री हॉटेल रविराजमध्ये ही कारवाई करण्यात आली.
विकास प्रकाश उत्तरवार (४२, रा. हिमायतनगर, नांदेड), विलास देवराव कुहिले (४२, रा. जरूळ, वैजापूर), शंकर बबन काजळे (३६, रा. चिकलठाणा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांना हॉटेल रविराजच्या खोली क्रमांक ३१० व ३१४ मध्ये जादूटोणा करून नोटांचा पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी पथकासह सायंकाळी ७ वाजता हॉटेल रविराजच्या दोन्ही खोल्यांत प्रवेश केला. खोली क्रमांक ३१० मध्ये तिघेही आरोपी जादूटोण्याच्या तयारीत होते. उत्तरवारने चौकशीत सांगितले की कुहिले व काजळे यांनी त्याला जादूटोणा करून रोख रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. सहायक निरीक्षक महांडुळे यांनी तत्काळ तिघांना अटक करत पहाटे त्यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
काय आढळले खोलीत?
खोलीत जादूटोण्याचे बरेच साहित्य आढळून आले. त्यात विविध जडीबुटी, काळी पावडर, मंत्र लिहिलेले कागद, काळे-लाल कापड, शेंदूर लावलेल्या पुड्या, पांढऱ्या कवड्या, वाळलेले लिंबू यांचा समावेश आहे.
४ लाखांत तीन कोटी!
शंकर व विलास हे दोघेही नेहमीच जादूटोणा करतात. त्यांनी उत्तरवारकडून गुरुवारपर्यंत ४ लाख रुपये उकळले होते. त्यात हॉटेलच्याच खोलीत पूजा झाल्यानंतर जवळपास ३ कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पडणार, असे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी हजारो बनावट नोटाही सोबत आणल्या होत्या.
उत्तरवार उद्योजक, कोट्यवधींचे धनादेश
उद्योजक राहिलेल्या उत्तरवारच्या २०११ पासून जवळपास तीन कंपन्या होत्या. कोरोनाकाळानंतर मात्र तो आर्थिक अडचणीत सापडला. सध्या तो जमिनीचे व्यवहार करतो. डिसेंबर २०२४ पासून तो रविराजच्या खोली क्रमांक ३१० मध्ये एकटाच राहत आहे. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचे धनादेश सापडले. कुहिले मंडपाचा व्यवसाय करतो, तर काजळेचे चिकलठाण्यात चहाचे हॉटेल आहे. त्या दोघांसाठी उत्तरवारने दीड महिन्यांपासून खोली क्रमांक ३१४ बुक केली होती.