नाथषष्ठीला ५ लाख वारकऱ्यांच्या पसायदानाने दुमदुमले पैठण; विश्वविक्रमाची 'गिनीज बुक'मध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:54 IST2026-03-11T18:53:58+5:302026-03-11T18:54:35+5:30

पैठण नाथषष्ठी विशेष; ८ वर्षांची परंपरा आणि ९ व्या वर्षी जागतिक विक्रम; पसायदानाचा जागतिक संदेश

World Record in Paithan: 5 Lakh Devotees Chant 'Pasaydan' Together; Enters Guinness Book of World Records | नाथषष्ठीला ५ लाख वारकऱ्यांच्या पसायदानाने दुमदुमले पैठण; विश्वविक्रमाची 'गिनीज बुक'मध्ये नोंद

नाथषष्ठीला ५ लाख वारकऱ्यांच्या पसायदानाने दुमदुमले पैठण; विश्वविक्रमाची 'गिनीज बुक'मध्ये नोंद

पैठण : संत परंपरेने पावन झालेल्या पैठण नगरीत यंदाच्या नाथषष्ठी महोत्सवात एक ऐतिहासिक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विश्वशांतीचा संदेश देणारे ‘पसायदान’ तब्बल पाच लाखांहून अधिक भाविकांनी एकाच वेळी सोमवारी दुपारी २:३० वाजता सामूहिकरीत्या गायले. या अभूतपूर्व उपक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली असून, पैठणच्या भूमीतून जगाला शांततेचा संदेश देणारा हा एक अद्वितीय जागतिक विक्रम ठरला आहे.

संत एकनाथ महाराज संस्थान आणि विविध सहयोगी संस्थांच्या पुढाकारातून हा भव्य उपक्रम साकारण्यात आला. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात लाखो वारकरी, नाथभक्त आणि भाविकांनी एकत्र येत पसायदानाचे पठण केले. हजारो कंठांतून एकाच वेळी उमटलेले पसायदान ऐकताना संपूर्ण परिसर अक्षरशः भक्तीमय झाला होता.

याबाबत माऊली संस्थानचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे जगाला सुख, शांती आणि सद्मार्ग दाखवणारे आहे. पैठणच्या भूमीतून घुमलेला हा संदेश संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे.

या ऐतिहासिक विक्रमाचे मुख्य श्रेय संस्थानचे अध्यक्ष आ. विलास भुमरे यांना दिले जात आहे. या विक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवचरित्र पारायण सोहळ्याचे संस्थापक प्रा. चंद्रकांत भराट, कार्यकारी विश्वस्त दादा बारे, नंदलाल काळे, प्रा. संतोष तांबे, प्रा. संतोष गव्हाणे, शहादेव लोहारे, प्रा. विजय सुरासे आदींनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.

८ वर्षांची परंपरा, ९ व्या वर्षी विक्रम
पसायदानाच्या सामूहिक पठणाची परंपरा पैठणमध्ये गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. यंदा नवव्या वर्षी या उपक्रमाने जागतिक स्तरावर झेप घेत नवा इतिहास रचला. आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात संत ज्ञानेश्वरांनी दिलेला पसायदानाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

Web Title : पैठण में प्रार्थना गूंजी; गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड स्थापित किया।

Web Summary : पैठण में पांच लाख से अधिक भक्तों ने सामूहिक रूप से 'पसायदान' का पाठ किया, जिससे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बना। संत एकनाथ महाराज संस्थान द्वारा आयोजित इस कार्यक्रम ने शांति और आध्यात्मिकता का एक वैश्विक संदेश फैलाया। सामूहिक प्रार्थना शहर के लिए एक ऐतिहासिक क्षण था।

Web Title : Paithan resonates with prayers; sets Guinness World Record.

Web Summary : Over five lakh devotees collectively recited 'Pasaydan' in Paithan, achieving a Guinness World Record. The event, organized by Sant Eknath Maharaj Sansthan, spread a global message of peace and spirituality. The collective prayer was a historic moment for the town.