'मेहनत बोलली!' छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने इराणपर्यंत पोहोचवली केळी, भावही तगडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:00 IST2025-11-08T13:58:51+5:302025-11-08T14:00:33+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा गावाचे नाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झळकले

'मेहनत बोलली!' छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्याने इराणपर्यंत पोहोचवली केळी, भावही तगडा!
- शंकर खराटे
सावळदबारा (छत्रपती संभाजीनगर) : येथील तरुण शेतकरी दीपक शिवाजीराव बुढाळ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर गावातील केळी थेट इराणपर्यंत निर्यात करण्यात यश मिळवले आहे. पारंपरिक शेतीसोबत नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती आणि दर्जेदार उत्पादनावर भर दिल्याने सावळदबारा या छोट्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय बाजारात झळकले आहे.
साबळदबारा येथील शेतकरी बुढाळ यांनी यंदा केळीच्या पाच हजार झाडांची लागवड केली; परंतु फळ तयार झाले आणि बाजारात केळीचे दर ३८० रुपयांपर्यंत घसरले. त्यामुळे आता लागवडीवरील खर्च तरी वसूल होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला; परंतु अशा परिस्थितीत बुढाळ यांनी उत्पादित केलेल्या उच्च प्रतीच्या केळीला निर्यातदारांनी पसंती दिली आणि थेट इराणला केळी पाठवण्यासाठी करार झाला. आतापर्यंत त्यांनी २६ टन केळी इराणला निर्यात केली असून, त्यांना प्रतिक्विंटल ८०० रुपयांचा दर मिळाला.
साठवण तलावाचा फायदा
गावातील काही वर्षांपूर्वी बांधलेल्या साठवण तलावामुळे बागायती शेती शक्य झाली. त्याच सुविधेमुळे बुढाळ यांना केळी लागवडीचा प्रयोग करता आला. शेतकऱ्यांनी परिस्थितीला न जुमानता आपल्या जमिनीचा प्रकार ओळखून नव्या पद्धतींचे प्रयोग करावेत, असे दीपक बुढाळ म्हणाले.
मुलांची मेहनत
जि.प.चे माजी सदस्य शिवाजीराव बुढाळ यांनी सांगितले की, मर्यादित साधनांमध्ये प्रायोगात्मक पद्धतीने केळीची लागवड केली होती. मुलांनी रात्रंदिवस मेहनत करून निर्यातक्षम दर्जेदार केळी तयार केली. या यशामुळे संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.
प्रयोगशील शेती करावी
शेतकऱ्यांनी परिस्थितीमुळे खचून न जाता, आपल्या जमिनीचा प्रकार आणि साधनसंपत्ती ओळखून विविध पिकांची प्रयोगशील शेती करावी. अशा नव्या पद्धतींनी शेतीला नवे मार्ग मिळतील.
- शिवाजीराव बुढाळ, शेतकरी